आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाच्या बोगस नोंदी; दोषींवर वीज कडाडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - पावसाच्या सर्कलनिहाय नोंदींचा बट्टय़ाबोळ झालेला असताना कागदावर मात्र दररोजच्या नोंदी घेतल्याचा बाऊ केला जात आहे. या नोंदी कितपत सत्य आहेत, याबाबत आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर प्रशासनाने सजगता दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी नियमाप्रमाणे पावसाळ्यापूर्वी तहसीलदार तथा वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पर्जन्यमापक यंत्रांचीही तपासणी झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महसूल विभागाने पावसाच्या नोंदी घेण्यासाठी जिल्ह्यातील 42 सर्कलच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. हवामान विभागानेही काही भागात स्वतंत्र यंत्रणा बसवली आहे. पावसाळ्यात दररोज सकाळी 8 ते 8.30 वाजेपर्यंत पर्जन्यमानाची नोंद घेऊन मंडळ अधिकार्‍यांमार्फत संबंधित तहसीलला आकडेवारी कळवणे अभिप्रेत आहे. मंडळ अधिकारी आणि तलाठय़ांवर ही जबाबदारी निश्चित केलेली असते. तलाठी किंवा मंडळ कार्यालयाच्या परिसरात, छतावर पर्जन्यमापक कें द्र उभारणे आवश्यक आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या नोंदीचा खेळ झाला आहे. काही ठिकाणी खासगी व्यक्ती पावसाच्या नोंदी घेत असल्याचे समोर आले आहे.


प्रशासनावरचा विश्वास उडाला
खोट्या नोंदी करणार्‍या कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत. प्रशासनावर नियंत्रण नसल्यामुळे खासदार, आमदारांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा. अन्यथा संघटना तीव्र आंदोलन करेल. रामजीवन बोंदर, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.


प्रशासनाने शेतकर्‍यांच्या पिळवणुकीचा प्रकार सुरू केला आहे. माझे निलंबन रद्द झाल्यास याच अधिवेशनात आवाज उठवणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी आतातरी संबंधित तलाठय़ांना निलंबित करून पर्जन्यमापक यंत्राची स्वत: तातडीने पाहणी करावी. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार,शिवसेना


अंदाधुंद कारभार
स्टिंग ऑपरेशनमधून आढळलेल्या बाबीनुसार काही भागात पर्जन्यमापक यंत्रच गायब झालेले होते. ‘दिव्य मराठी’ची टीम पोहोचल्यानंतर कुणकुण लागताच तलाठय़ाने गावकर्‍यांसमक्ष घरात अडगळीला पडलेले हे यंत्र आणून बसवले. आतापर्यंतच्या नोंदीबाबत विचारणा केल्यानंतर ‘रिपोर्ट रोजच देत होतो’ असे सांगण्यात आले. याचा अर्थ आतापर्यंत पावसाळ्यातील सर्वच नोंदी अंदाजे नोंदवण्यात आल्या आहेत.