आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीनचे पाच कोटींचे बोगस बियाणे जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - उदगीर एमआयडीसी भागात छापा मारून बुधवारी 600 टन (किंमत पाच कोटी) बोगस सोयाबीन बियाणे जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस, महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या केली. मोठय़ा प्रमाणात बियाण्याचा साठा सापडल्याने रात्री उशिरापर्यंत त्याची मोजणी सुरूच होती. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होत आहे.

उदगीर येथील अखिल गफार चौधरी याचे एमआयडीसी भागात दोन गोदाम आहेत. त्याचा फुटाण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातूनच शेतकर्‍यांना फसवण्याचा धंदा सुरू होता. दुपारी पथकाने छापा मारला तेव्हापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन्ही गोदामांतून 600 टन बोगस बियाणे जप्त करण्यात आले होते. मोजदाद आणखी सुरूच होती. मध्य प्रदेशातील सागर सीड्सच्या नावाखाली या बियाण्यांचे पॅकिंग करून ते शेतकर्‍यांच्या माथी मारले जात होते. या कंपनीच्या अनमोल 355 या नामांकित वाणाच्या पिशव्यात हे बियाणे भरताना चार ट्रक पकडण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशातील संजयकुमार शांतीलाल जैन याने हा सगळा गोरखधंदा सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु सागर सीड्स या कंपनीचा यात थेट सहभाग आहे की नाही, हे तपासांती स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

दोघांना घेतले ताब्यात : पोलिसांनी गोडाऊनचा मालक अखिल गफार चौधरी व या काळ्या धंद्याचे कामकाज पाहणारा शर्मा नावाच्या मुनिमालाही ताब्यात घेतले आहे. शिवाय दोन ट्रकही ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक र्शीकृष्ण कोकाटे, उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, गटविकास अधिकारी बी.डी. गिरी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष पाटील, पोलिस निरीक्षक गोविंद राठोड, हणमंत परांडे आदींच्या पथकाने गोरखधंदा चव्हाट्यावर आणला.
असा सुरू होता धंदा
चौधरीच्या गोडाऊनमध्ये एका बाजूला फुटाणे तर दुसल्या बाजूला बोगस बियाण्यांच्या पिशव्या भरल्या जात होत्या. पिशवीवर सागर अँग्रो, उज्जैन असे लिहिले आहे. 30 किलो वजनाची ही बॅग 2550 रुपयांना विक्री केली जात होती.