आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bordikar's Rehabilation In Parbhani District Bank

घोटाळेबाज बोर्डीकरांचे अखेर राजकीय पुनर्वसन,परभणी जिल्हा सहकारी बँकेतील खेळी यशस्वी;

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - पाच वर्षांपूर्वी आमदार असतानाच राजकीय विजनवासात गेलेल्या आणि जिल्हा बँकेत अध्यक्ष असताना साडेसात कोटींच्या विमा घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांचे यंदाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन झाले. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर ३० वर्षांपासून आपले वर्चस्व अबाधित राखणा-या माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दिग्गजांचा विधानसभा निवडणुकीत नवख्यांकडून पराभव झाला. यानंतर कारकीर्द झाकोळण्याची चिन्हे निर्माण झालेली असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोघांनी एकत्र येऊन खेळलेली खेळी पूर्णपणे यशस्वी झाल्याने या दोघांचेही सहकार क्षेत्रातील वर्चस्व अबाधित राहिले. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कधी सोबत तर कधी एकमेकांचे कट्टर वैरी अशा भूमिकेत राजकीय प्रवास करणा-या वरपुडकर-बोर्डीकरांनी वेळप्रसंगी हातमिळवणी करीत विरोधकांवर मात करण्याची खेळी कायम खेळली आहे. त्यातून त्यांना यशही आले.

पाटलांनी बांधली विरोधकांची मोट : या दोघांनाही विजनवासात ठेवण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी वरपुडकर-बोर्डीकरांचे विरोधक आमदार विजय भांबळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मधुसूदन केंद्रे यांना सोबत घेऊन पॅनलच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न केले. शह-काटशहाचे राजकारण रंगले.
परंतु दिग्गजांच्या या लढाईत वरपुडकर-बोर्डीकर सरसच ठरले. २५ ते ३० वर्षांतील राजकीय अनुभव, डावपेच, खेळ्या खेळण्यात ते दोघेही यशस्वी ठरले. २१ पैकी १७ जागांवर त्यांनी आपल्या पॅनलला यश मिळवून दिले. त्यामुळे आगामी काळात जिल्हा बँकेसह सहकारी क्षेत्रातील निवडणुकांवर या दोन दिग्गजांचा दबदबा राहणार, हे स्पष्ट झाले आहे.

वरचष्मा कायम तरी अस्वस्थता
वरपुडकर २००९ मध्ये लोकसभा व त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पराभूत झाले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा दबदबा कायम होता. त्यांचे पुत्र समशेर वरपुडकर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विराजमान होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा वरचष्मा होताच, परंतु प्रत्यक्ष सत्तेत त्यांना स्वत:चे स्थान नव्हते. त्यामुळे राजकीय अस्वस्थता कायम होती. २०१४ च्याही निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून पाथरीतून निवडणूक लढवली. पण त्यांना पराभवाला तोंड द्यावे लागले.

दुहेरी पराभवाचे दु:ख
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बोर्डीकरांचे कट्टर राजकीय वैरी विजय भांबळे यांनी दोन वेळच्या प्रयत्नानंतर तिस-या वेळी बोर्डीकरांना पराभवाची चव चाखण्यास भाग पाडले. बँकेचे अध्यक्षपद जाण्यापाठोपाठ विधानसभेतही पराभव झाल्यामुळे तेही राजकीय विजनवासातच होते.