आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BPL, APL Ration Cards Will Be Canclled Anil Deshmukh

बीपीएल, एपीएल शिधापत्रिका रद्द होणार - अनिल देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - बीपीएल आणि एपीएल लाभधारकांसाठी असलेल्या रंगीत शिधापत्रिका रद्द करून सर्वांना पांढ-या रंगाच्या शिधापत्रिका देण्यात येणार आहेत. मात्र, अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ केवळ ‘बारकोडेड’ शिधापत्रिकाधारकांनाच दिला जाईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सद्य:स्थितीतील पुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी देशमुख गुरुवारी हिंगोलीत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्य शासनाला दरमहिन्याला 4 लाख मेट्रिक टन अन्नधान्य केंद्राकडून मिळणार आहे. या योजनेवर राज्यात दरमहिन्याला 800 कोटी रुपये खर्च होणार आहेत. यामुळे ही योजना गांभीर्याने राबण्यात येणार आहे. 2011-12 मध्ये राज्यात 12 लाख अपात्र शिधापत्रिका रद्द केल्या आहेत.


हिंगोली, अकोला व परभणी हिटलिस्टवर : मराठवाड्यातील हिंगोली व परभणी आणि विदर्भातील अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये रेशनचे धान्य आणि केरोसीनचा काळाबाजार राज्यात सर्वाधिक होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
या तीन जिल्ह्यांमध्ये पोलिस व महसूल विभागाच्या अधिका-यांनी संयुक्त कारवाई करून गैरप्रकारांना आळा घालण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली.