आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Breaking The Matka In Latur Responsbility To Shree Krishna

लातुरात ‘मटका’ फोडण्याची जबाबदारी पोलिसातील ‘श्रीकृष्णा’वर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून सुखेनैव सुरू असलेल्या मटका आणि जुगाराच्या अड्ड्यांवर सोमवारी रात्री धाडी टाकण्यात आल्या. बुकींवर धाडी टाकून ते बंद करण्याची जबाबदारी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनी 13 टीम तयार केल्या असून सोमवारी धाडसत्र राबवण्यात आले. पहिल्याच झटक्यात पोलिसांना फारसे यश आले नाही. एमआयडीसीतील रेसिडेन्सी क्लबमध्ये अवैधरीत्या जुगार खेळणा-या 19 जणांना अटक केली असून 64 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी सांगितले की, काही दिवसांपासून मटका सुरू असल्याची माहिती मिळत होती. त्याआधारे एक लिस्ट बनवण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी सोमवारी रात्री पाच-सहा ठिकाणी धाडी टाकल्या. यापुढेही कोकाटे यांच्यावर मटक्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे गायकर यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी शहरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये अवैधरीत्या जुगार सुरू असल्याचे निवेदन एसपींना दिले होते. 31 डिसेंबरला परवान्याची मुदत संपल्यानंतरही त्याचे रिन्युअल झाले नाही. तरीही जुगार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली असता जुगार खेळणा-या 19 जणांना अटक करण्यात आली. 64 हजार रुपयांची रोख रक्कम, साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तपासणीमध्ये रेसिडेन्सी क्लबच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नसल्याचे आढळून आले. राजमुद्रा, ईडन गार्डन आणि कोल्डन कोर्ट येथेही धाडी टाकण्यात आल्या; परंतु हे तीनही क्लब बंद असल्याचे आढळून आले.

तो क्लब नरहरेंचा
धाड टाकलेला रेसिडेन्सी क्लब शिवाजी नरहरे यांच्या मालकीचा आहे. ते जनता विकास परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार क्लबच्या परवान्याचे मार्च एंडपर्यंतचे नूतनीकरण केलेले आहे. आपल्या क्लबमध्ये कार्डरूम असून तेथे पत्ते खेळता येतात. मात्र, पोलिस पत्ते खेळण्याचा वेगळा परवाना असल्याचे सांगत आहेत. त्यातून हा धाडीचा प्रकार झाल्याचे नरहरे यांनी सांगितले.

कारवाई भासवण्यासाठी धडपड
नांदेड रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप बिष्णोई पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी येत आहेत. त्यांच्यासमोर पोलिस कारवाईचे चित्र जावे यासाठी ही धडपड सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर आणि अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्याचा इन्कार केला आहे. ही रुटीन कारवाई असून ती पुढेही चालूच राहील, असे या दोघांनी सांगितले.

तेरा पथकांची स्थापना
पोलिस अधीक्षकांनी यादी सोपवल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, विविध ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यांची 13 पथके बनवली. त्यातील एकालाही कुठे जायचे आहे, याची कल्पना दिली नाही. त्यानंतर आपली हद्द सोडून त्यांना धाडी टाकायला सांगितल्या. एकाचवेळी कारवाया झाल्या. मात्र, त्यातील पाच ठिकाणीच बुकी आढळले. बहुतांश ठिकाणचे संशयित फरारी झाल्याचे आढळले. त्यामुळे फारसे काही हाती लागले नाही. श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक