आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखाची लाच घेताना तीन कर्मचार्‍यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - आंतरजिल्हा बदली प्रकरणातील अनियमिततेच्या कारणावरून निलंबित असलेल्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक प्रशासकीय अधिकार्‍याचे निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी पाच लाखांची मागणी करून दीड लाख रुपये स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचार्‍यांना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.

सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी परसराम बप्पासाहेब आसरूळ, वरिष्ठ सहायक पांडुरंग शिवराम शिंदे व कनिष्ठ प्रशासन अधिकारी देवीदास ठोकरे अशी आरोपींची नावे आहेत. बीडसह जालना, औरंगाबाद या तीन ठिकाणच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी प्रवीण येवले यांना 22 नोव्हेंबर 2013 रोजी आंतरजिल्हा बदली प्रकरणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी निलंबित केले होते.

निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात यावे, यासाठी प्रवीण येवले यांना सामान्य प्रशासन विभागातील तीन जणांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. टप्प्याटप्प्यात पैसे देण्याचे ठरले होते.

दोघे रंगेहाथ, तिसर्‍यास कार्यालयातून अटक
आसरूळ, शिंदे यांना रंगेहाथ पकडले. ठोकरे यांचा यात सहभाग असल्याने ते घटनास्थळी उपस्थित नसले तरी त्यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातून अटक केली. तिघेही तृतीयर्शेणी कर्मचारी आहेत.