आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आणखी करप्शन’खात्याच्या उपअधीक्षकावर लाचेचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लाचखोरांना अटकाव करण्यासाठी  लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची अर्थात अँटी करप्शन खात्याची स्थापना करण्यात आली. मात्र याच खात्याच्या पोलिस उपाधीक्षकानेच  प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका वाहन निरीक्षकाकडून एजंटामार्फत ५० हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध लातूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.   
 
लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक सुरेश शेटकर यांनी आठ दिवसांपूर्वी लातूर येथील आरटीओ कार्यालयात नेमणुकीस असलेल्या एका वाहन निरीक्षकाला फोन केला. तुमच्याबद्दल आमच्याकडे तक्रार आली आहे, येऊन भेटा, असा निरोप दिला. त्या वाहन निरीक्षकाने शेटकर यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्याच्याकडे तक्रारीबाबत चौकशी न करण्यासाठी शेटकर यांनी १ लाख रुपयांची मागणी केली. दरम्यानच्या काळात वाहन निरीक्षकाने मुंबई गाठून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महानिरीक्षक विवेक फणसळकर यांची भेट घेऊन शेटकर लाच मागत असल्याची तक्रार केली. तसेच फोनवरील संभाषणाचे रेकाॅर्डिंगही फणसळकर यांच्याकडे  सुपूर्द केले. त्याची दखल घेऊन फणसळकर यांनी दोन पथकांची स्थापना करून लातूरला पाठवले. 

सापळ्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सुरेश शेटकर यांनी वाहन निरीक्षकाशी संपर्क केला. तसेच मध्यस्थी म्हणून आरटीओ कार्यालयात एजंट असलेल्या विजय ऊर्फ छोटू गडकरी याच्याकडे पैसे देण्याचे ठरले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास औसा रोडवर असलेल्या दत्तकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये छोटू गडकरी याने उपअधीक्षक सुरेश शेटकर यांच्यासाठी लाचेचे ५० हजार रुपये घेतले. त्या वेळी मुंबई येथील पथकाने गडकरीला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. मुंबईहून आलेल्या दुसऱ्या एका पथकाने सुरेश शेटकर यांच्या अहमदपूर येथील निवासस्थानावरही त्याच वेळी धाड टाकली. मात्र त्या ठिकाणी काय आढळून आले याबद्दल अधिक माहिती सांगण्यात आली नाही.   

उपअधीक्षक फरार   
मुंबईहून आलेल्या पथकाने गडकरी याला लाच घेताना पकडल्याचे समजताच लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. उपअधीक्षक शेटकर एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा त्यांचा मोबाइलही बंद होता. मुंबईहून आलेल्या पथकाने स्थानिकच्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाची झडती घेतली. रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. सकाळी नांदेडहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय लाठकर लातूरमध्ये दाखल झाले. त्यांनी लातूरच्या कार्यालयाचा पदभार नांदेडचे उपअधीक्षक एम. व्ही. बेद्रे यांच्याकडे दिला. लाठकर यांनी नक्की काय घडले याची माहिती पत्रकारांना दिली आणि ते पुन्हा नांदेडला  रवाना झाले. दरम्यान, या प्रकरणात पैसे घेणारा मध्यस्थ छोटू गडकरी याला अटक झाली असली तरी मुख्य आरोपी असलेले सुरेश शेटकर शनिवारी सायंकाळपर्यंत फरार होते.   

लातुरात चर्चेला पेव 
लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी स्थापन झालेल्या या विभागाला  उपहासाने “अाणखी करप्शन’ विभाग असे म्हटले जाते. याची प्रचिती शेटकर यांच्यावरील कारवाईमुळे आली आहे. या खात्यात उपअधीक्षक दर्जाचे पद भूषवणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्यावरच कारवाई झाल्याने चर्चेला पेव फुटले आहे.
बातम्या आणखी आहेत...