आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: लाच मागणारा पोलिस एसीबीच्या जाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जालना- गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला कारागृहामध्ये न पाठवता तपासात मदत करण्यासाठी ६ हजार ३०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)कारवाई केली. आत्माराम श्रीराम अंभाेरे असे पकडलेल्या पोलिसाचे नाव असून तो बदनापूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान, सोमवारी हिवताप विभागाच्या अधिकाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली होती.   

या प्रकरणातील तक्रारदाराचे मेहुणे जगन्नाथ गोळे यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात गाेळे यांना कारागृहात न पाठवता तपासात मदत करण्यासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल आत्माराम अंभोरे याने  दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ३ हजार ७०० रुपये लगेच घेऊन उर्वरित ६ हजार ३०० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे तक्रार दिली. त्यावरून  सापळा रचून अंभोरेवर कारवाई करण्यात आली.

बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा अंभोरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आैरंगाबादचे अपर पोलिस अधीक्षक एस.आर.जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक व्ही.एल.चव्हाण, पोलिस निरीक्षक आजीनाथ काशीद तसेच कर्मचारी अमोल आगलावे, रामचंद्र कुदर, नंदू शेंडीवाले, संदीप लव्हारे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण यांनी पार पाडली.

पंचांसमक्ष पडताळणी
१२ जुलै २०१७ रोजी आत्माराम अंभोरे यांनी केलेल्या लाचेच्या मागणीबाबत पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. सदर पडताळणीमध्ये पंचांसमक्ष तक्रारदार व आरोपी लोकसेवक बीट जमादार अंभोरे यांच्यामध्ये तक्रारदाराच्या कामाबाबत व लाचेच्या पैशाच्या देवाण-घेवाणीबाबत बोलणी झाली. या वेळी तक्रारदार यांनी मी तुम्हाला ३ हजार ७०० रुपये दिलेले असून सहा हजार ३०० देणे आहे, असे अंभोरे यांना सांगितले. त्यावर अंभोरे याने हो असे म्हणून ६ हजार ३०० रुपये पोलिस ठाणे बदनापूर येथे आणून देण्याचे सांगितल्याचे निष्पन्न झाले. 
बातम्या आणखी आहेत...