आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाखरांसाठी जागणार प्रेम; १३ पासून गणना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पर्यावरण संतुलनात योगदान देताना सृष्टीलावण्य फुलवणा-या पाखरांचे संवर्धन करण्याची मानसिकता आता जनमानसातही रुजत असून ती अधिक दृढ व्हावी अन् त्यात लोकसहभागही वाढावा यासाठी जगभरातील पक्षिमित्र प्रयत्नशील झाले आहेत. दुर्मिळ पक्ष्यांप्रमाणे घर, परिसरांत आढळणा-या पक्ष्यांच्या प्रजाती व त्यांचे वास्तव आजमावण्यासाठी नागरिकांच्या माध्यमातून १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत पक्षीगणना केली जाणार आहे.

दुर्मिळ, संकटग्रस्त पक्ष्यांवर अभ्यासक, संशोधक व शास्त्रज्ञांचे लक्ष असते. त्यामुळे अशा पक्ष्यांची संख्या कळते व त्यांच्या संशोधन अन् संवर्धनासाठी नेमकी उपाययोजना करणे शक्य होते. तथापि, ही तत्परता घर-परिसरात आढळणा-या पाखरांबाबत दाखवली जात नाही. त्यामुळे त्यांचे वास्तव आजमावता येत नाही. नेमकी ही उणीव दूर करण्यासाठी बँकयार्ड बर्ड काउंट या नावाने पक्षीगणना सुरू करण्यात आली आहे.

कसे व्हाल सहभागी : www.ebird.org या संकेतस्थळावर जाऊन आपले अकाउंट काढा. पक्षीगणना केलेल्या कालावधीत आपणास आढळलेल्या पक्ष्यांची नावे अन् संख्या याची माहिती सदर संकेतस्थळावर टाका. १६ फेब्रुवारीनंतर ती जगभरात संकलित केली जाईल.
भारत नंबर वन : पाच वर्षांपूर्वी भारतात ही गणना सुरू झाली. गतवर्षी जगातील १३५ देशांतील नागरिकांनी यात सहभाग नोंदवून चार हजार प्रजातींची माहिती दिली. त्यात अकराशे नागरिक भारतातील होते. त्यांनी पक्ष्यांच्या ८२३ प्रजातींची माहिती दिली.

अभ्यासाला दिशा
माहितीच्या आधारे परिसरात आढळणा-या पक्ष्यांच्या प्रजाती व त्यांची संख्या सहज समजेल. माळढोक, पिंगळा, गिधाडे अशा संकटग्रस्त पक्ष्यांबाबत आपणाला माहिती कळली. तथापि अंगणातले चिऊ - काऊ कशामुळे रोडावले?, हे समजण्यास मात्र खूप उशीर झाला. या पक्षीगणनेमुळे अशा पक्ष्यांचे वर्तमान कळेल, अभ्यासक संशोधकांना अभ्यासविषय मिळेल. पक्ष्यांच्या संगोपन अन् संवर्धनासाठी उपाययोजना करणे शक्य होईल, हाच प्रांजळ उद्देश या गणनेमागे आहे.
कुलभूषण सूर्यवंशी, पक्षी संशोधक, बंगळुरू