आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवीस वर्षांनंतर तो परतला; मात्र बहिणीच्या दारातच !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - गावात असताना सतत भांडणे करायची. घरातही नेहमीच कुरबुर व्हायची. याला कंटाळून वयाच्या 18 व्या वर्षी घर सोडले. तब्बल 25 वर्षांनंतर तो घरी परतल्याने कुटुंबाला आनंदाचे भरते आले. भावाला पाहून बहिणीच्या तर डोळ्यांत आनंदार्शू तरळले.
‘सुबहा का भुला शाम को घर लौटता है उसे भुला नही कहते ’ असाच काहीसा प्रत्यय बीड तालुक्यातील गवारी येथे आला आहे. गवारी येथील बळीराम रसाळ यांना तीन मुले व तीन मुली आहेत. यातील राजेंद्र रसाळ हा सर्वात लहान. त्यामुळे घरातील लोक त्याचा लाड करीत असत. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच घेतले. रागीट स्वभाव असलेल्या राजेंद्रचे महाविद्यालयात आणि गावात कोणा सोबत तरी भांडणे व्हायची. भांडणामुळे घरी येणार्‍या तक्रारीला कुटुंबही वैतागले होते. राजेंद्रला भांडणाचा पश्चात्ताप झाला व त्याने 1985 मध्ये घर सोडले. शेवटी शोध घेऊनही तो सापडत नसल्याने राजेंद्रला विसरण्याचा प्रयत्न करू लागले. इकडे राजेंद्र पुण्याला येऊन तेथे मजुरी करून आपली उपजीविका भागवू लागला. राजेंद्रला लग्नानंतर दोन मुली एक मुलगा झाला. त्याची पत्नी बॅँकेत लिपिक आहे व एक मुलगा मतिमंद आहे. स्वत:च्या मुलावर असलेले प्रेम अनुभवून त्याला आई-वडील, भाऊ-बहिणीची आठवण आली. पंचवीस वर्षांनंतर तो बहिणीच्या घरी परतला. गावाकडे आई, वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या आठवणीने आणखी दु:ख होईल. म्हणून तो गावात जाण्याऐवजी शहरातील खडकपुरा भागात असलेल्या बहीण काशीबाई बजगुडे यांच्या घरी गेला. भावाला पाहताच बहिणीच्या डोळ्यांत आनंदार्शू आले. घरातील भाच्यांना माहीतच नव्हते आपला मामा कोण आहे ? ते कोठून आले ? शेवटी बहीण काशीबाई हिने भावाची ओळख करून दिली.
भाऊ आल्याने आनंद - तो गेल्यापासून त्याने कधी फोन केला नाही. कसलीही माहिती नव्हती. मध्यंतरी दंगली झाल्या, बॉम्बस्फोट झाले. आम्हाला वाटले की आता त्याचे काही तरी बरवाईट झाले असावे. त्याच्या आठवणीने सतत डोळ्यांत पाणी येत होते. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण आले की आमचा भाऊ आता आम्हाला कधी भेटणार ? असे वाटायचे. तो घरी परतल्याने आम्हाला आनंद झाला आहे.’’ - काशीबाई आसाराम बजगुडे, बहीण
कामासाठी भटकंती - बीड सोडल्यानंतर मजुरी मिळत नव्हती. हालअपेष्टा सहन केल्या. लोकांचा विश्वास मिळविला मजुरीसाठी राज्यातील चोवीस जिल्ह्यांत भटकंती केली. पोटासाठी मिळेल ते काम केले परंतु घरी परतलो नाही. तरी मी माझ्या पायावर उभा आहे.’’ - राजेंद्र रसाळ,बीड