आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बसचे टायर फुटल्यामुळे अजब अपघात; बहीण-भाऊ चाकाखाली येऊन जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावत्या लक्झरी बसला अचानक झटका बसताच सीटच्या खालील पत्रा निखळला. यात बहिण भावाच्या शरीरांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. - Divya Marathi
धावत्या लक्झरी बसला अचानक झटका बसताच सीटच्या खालील पत्रा निखळला. यात बहिण भावाच्या शरीरांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
जळगाव - धावत्या लक्झरी बसला अचानक झटका बसताच सीटच्या खालील पत्रा निखळल्याने सीटवर बसलेले बहीण-भाऊ खाली कोसळले आणि मागच्या चाकाखाली आले. यात दोघांचाही जागीच अंत झाला. ही घटना शनिवारी रात्री औरंगाबाद-नगर रस्त्यावर घोडेगाव नजीक घडली. मृत दोघे बहीण-भाऊ मन्यानरखेड्याचे रहिवासी असून ते पुण्याहून जळगावला येत होते. रात्री दीडच्या सुमारास धावत्या गाडीचा पत्रा निखळल्याने एकाच सीटवर बसलेले हे दोघे धाडकन जमिनीवर कोसळून थेट मागच्या चाकात अडकले. गाडीला प्रचंड वेग असल्यामुळे दोघेही सुमारे ४० मीटरपर्यंत फरपटत गेल्याने दोघांच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. 
 
मृत्यूचे हे भयंकर तांडव पाहून साक्षात यमदूताचाही थरकाप उडाला असेल. अपघात एवढा भयंकर होता की, समोरचे विदारक दृश्य पाहून बसमधील अनेक प्रवाशांना भोवळ आली. अरुणा सुरेश मराठे (वय ४०) व गजानन सुरेश मराठे (वय २९) असे दुर्दैवी बहीण-भावाचे नाव आहे. अपघातात दोघांच्या मेहुण्यासह इतर प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, या विचित्र अपघातामुळे ट्रॅव्हल्स गाड्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.
 
झोपेतच मृत्यू
मन्यारखेडा येथे राहणारे गजानन व अरुणा मराठे आणि त्यांचे मेहुणे निंबा नथ्थू पजई हे तिघे १४ एप्रिल रोजी आळंदी येथे गेले होते. अरुणा यांची सर्वात लहान बहीण तुलसी ओंकार वटाणे यांचा मुलगा 'माऊली' याचा पहिला वाढदिवस असल्यामुळे तसेच गजाननसाठी मुलगी बघणे अशा दोन कामांसाठी हे तिघे जण आळंदीला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पुणे येथून कुलस्वामिनी ट्रॅव्हल्सने (एमएच- १९, वाय- ८००१) जळगावात येण्यासाठी निघाले. रात्री दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद आणि नगर जिल्ह्याच्या मध्यात असलेल्या घोडेगावजवळ झालेल्या अपघातात अरुणा व गजानन यांचा मृत्यू झाला. रात्री झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. एका ठिकाणी गतिरोधकावर भरधाव ट्रॅव्हल्सला मोठा झटका बसला. या दणक्यामुळे गजानन व अरुणा झोपलेले असलेल्या सीटच्या खालचा पत्रा कापला गेला.
 
पत्रा कापताच सेकंदाच्या आत त्यांचे सीट जमिनीच्या दिशेने आदळून मागच्या चाकात दोघांचेही शरीर अक्षरश: गुंडाळले गेले. मोठ्या आवाजामुळे इतर प्रवासी जागे झाले. त्यांना अपघाताची कल्पना येईपर्यंत लक्झरी सुमारे ४० मीटर अंतर पुढे निघून गेली होती. लोकांनी अारडा-ओरड केल्यानंतर चालकाने गाडी थांबवली. मागे पाहिल्यानंतर गजानन व अरुणा यांच्या मृतदेहाचा चेंदामेंदा रस्त्यावर पडलेला होता. काही अवयव तर चक्क लक्झरीच्या चाकाच्या फटीत अडकून पडले होते. हे भयानक चित्र पाहून अनेकांना भोवळ आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत गजानन व अरुणा यांचा मृत्यू झाला, त्यांच्या शिवाय इतर प्रवासी सुदैवाने सुखरूप आहेत.
 
सीट बदलल्यामुळे मेहुणे वाचले
अरुणा व गजानन यांच्यासोबत असलेले त्यांचे मेहुणे निंबा पजई हे देखील त्यांच्याच सीटवर बसले होते. पण झोपण्यासाठी ते शेजारच्या सीटवर गेले. सीट बदलल्याच्या अवघ्या दोन-तीन मिनिटांतच हा अपघात झाला. सुदैवाने पजई यांचा जीव वाचला.
 
कष्ट करून कुटुंबाचा गाडा ओढणारी 'अरुणा'
सर्व भावंडांमध्ये मोठी असलेली अरुणा हिचे २० वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. काही कारणास्तव ती माहेरीच राहत होती. सात-आठ वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्यामुळे सर्व भावंडांना आईचे प्रेम करून तीच कुटुंबाचा गाडा ओढत होती. वडील सुरेश मराठे हे एसटीत बसचालक होते. सध्या ते खासगी वाहन चालवतात. अरुणाचा एक विवाहित भाऊ एमआयडीसीत चटईच्या कंपनीत कामाला आहे. दोन लहान बहिणींची लग्ने झाली असून लहान भाऊ गजानन हा एकटाच अविवाहित होता. तो एका चारचाकीच्या शोरूमला कामाला होता. त्याच्यासाठी मुलगी पाहायला अरुणा पुण्याला गेल्या होत्या. दरम्यान, अरुणादेखील चटईच्या कंपनीत कामाला जाऊन कुटुंबाला हातभार लावत होती. अशा होतकरू व मनमिळाऊ अरुणा यांच्या अपघाती मृत्यूमुळे मन्यारखेडा गावात हळहळ व्यक्त झाली.  
 
पोलिस भरतीच्या वेळी लहान बहिणीला दिली साथ
जळगावात नुकतीच पोलिस भरती आटोपली. या पोलिस भरतीमध्ये अरुणा यांची आळंदीची लहान बहीण तुलसी वटाणे सहभागी झाल्या होत्या. त्यांना ११ महिन्यांचा मुलगा 'माऊली' याला अरुणा यांच्याकडे सोपवून तुलसीने पेपर सोडवला होता. मोठ्या बहिणीकडे तान्हुल्याला दिल्यामुळे तुलसी अगदी नि:संकोचपणे परीक्षेला समोरे गेल्या होत्या. अशाच प्रकारे अरुणा यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला साथ दिली होती. तुलसी ह्या विवाहापूर्वी जळगाव शहरात गृहरक्षक दलात होत्या. दरम्यान, या भरतीमध्ये दोन गुण कमी पडल्यामुळे त्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत.
 
लक्झरी बसच्या गुणवत्तेबाबत प्रश्न
उन्हाळ्याच्या सुटीचा हंगाम असल्याने अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल बेपर्वाई करणाऱ्या ट्रॅव्हल्स विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जळगाव ते पुणे, मुंबई, नागपूर अशा लांब पल्ल्याच्या लक्झरी बसेसची संख्या वाढली आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे बसेसची संख्याही वाढवावी लागत आहे. अशात लक्झरी मालक गाड्यांच्या गुणवत्तेपेक्षा संख्येवर अधिक भर देत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. धावत्या गाडीचा पत्रा तुटण्यासारख्या धोकादायक घटनेत या दोन्ही भाऊ-बहिणींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे खासगी लक्झरींच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
 
२ दिवसांत दोन अपघात  
याच रोडवर दोन दिवसांपूर्वीदेखील खासगी बस नादुरुस्त उभ्या कंटेनरला धडकल्याने दोन जण ठार झाले होते. खासगी बस  वाहनचालकांच्या चुकीने होत असलेल्या अशा अपघातांमुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...