आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील जुन्या बसस्थानकांची बीओटीवर पुनर्बांधणी - जीवनराव गोरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - राज्यातील 40 वर्षांपेक्षा जुन्या बसस्थानकांची बीओटी तत्त्वावर पुनर्बांधणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद, रत्नागिरी, कराड, अकलूज, नाशिक रोड व पनवेल या सहा बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

या कामाच्या निविदा महामंडळाला प्राप्त झाल्या असून छाननी सुरू आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल. नव्या बसस्थानकांत कमर्शियल हब, कर्मचा-यांसाठी विश्रांतीगृह, स्वच्छतागृह, प्रवाशांसाठी स्वच्छतागृह आदी सुविधा असणार आहेत. सहा बसस्थानकांच्या बांधणीनंतर राज्यातील बसस्थानकांचे सर्वेक्षण करून त्यापैकी जी अयोग्य असतील त्यांची पुनर्बांधणी करण्यात येईल. राज्यातील सर्व बसस्थानके अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असली पाहिजेत.

राज्यात साडेचार हजार चालक, साडेचार हजार वाहक व तीन हजार तांत्रिक कामगारांची भरती झाली आहे. सध्या या कर्मचा-यांचे प्रशिक्षण सुरू आहे. 1 एप्रिल ते 1 मे यादरम्यान हे नवे कर्मचारी कामावर रुजू होतील. त्यामुळे 1 एप्रिलपासून महामंडळाच्या कामात सुधारणा झालेली दिसेल, असेही गोरे यांनी सांगितले. युती शासनाच्या काळात महामंडळाच्या तोट्यात 1100 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली होती. दहा वर्षांत ती कमी करत 287 कोटींवर आणली आहे. मात्र, डिझेलच्या वाढत्या किमती, महामंडळ विविध 23 प्रकारच्या प्रवाशांना देत असलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या सवलती, खासगी वाहतूक यामुळे एसटीच्या तोट्यात सतत वाढ होत आहे. डिझेल दरवाढीमुळे आताही अपेक्षित तोटा 417 कोटी राहण्याची शक्यता आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने प्रवासी वाढवा योजना हाती घेतली आहे. या योजनेत मिळणा-या उत्पन्नातून दर एक रुपयामागे 12 पैसे प्रत्येकी वाहक, चालक व सात पैसे तांत्रिक कामगाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय जाहिराती, कमर्शियल कॉम्प्लेक्स या माध्यमातूनही उत्पन्न मिळवण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. याआधी झालेल्या नोकरभरतीत काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे नवीन भरतीचे काम आयबीपीएस या संस्थेला देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्त्वावर मराठवाड्यातील औरंगाबादसह रत्नागिरी, कराड, अकलूज, नाशिक रोड व पनवेल या सहा बसस्थानकांची बीओटी तत्त्वावर पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

नांदेडचा प्रस्ताव नाही
नांदेडचे बसस्थानक अत्यंत गैरसोयीचे झाले आहे. त्याचे स्थलांतर करण्यात येईल, असे स्थानिक पातळीवर सर्वच नेते दोन-तीन वर्षांपासून सांगत आहेत, परंतु हे बसस्थानक स्थलांतरित करण्याबाबत आपल्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असेही ते म्हणाले.