आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसने चिरडून बालकाचा मृत्यू,संतप्त जमावाची बसवर दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड (जि. जालना) - रस्ता ओलांडणा-या सहा वर्षीय बालकास एसटी बसने चिरडल्याची घटना जालना-बीड महामार्गावरील झिरपी फाट्याजवळ सोमवारी घडली. बालकाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक केली. यामुळे दीड तास वाहतूक ठप्प होती. रस्त्याच्या दुतर्फा तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सिद्धेश्वर विलास हामने (6, झिरपी, ता.अंबड) असे मृत बालकाचे नाव आहे. सिद्धेश्वर सोमवारी सकाळी 10 वाजता आईसोबत शेतात जाण्यासाठी रस्ता ओलाडत होता. त्याचवेळी अंबडहून बीडकडे जाणा-या जळगाव-परळी बसने (एमएच 14 बीटी -3054) सिद्धेश्वरला समोरून जोराची धडक दिली. घटनास्थळीच सिद्धेश्वरने प्राण सोडला.
अपघातानंतर चालक वैजनाथ गंगाधर चत्रभुजने (45 वर्षे, परळी) घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे संतप्त जमावाने बसवर दगडफेक केली. जवळपास 3 कि.मी. पेक्षा जास्त वाहतूक ठप्प झाल्याने महामार्ग जाम झाला. पळकुट्या बसचालकास घटनास्थळावर हजर करा, असा आक्रमक पवित्रा जमावाने घेतला. नातेवाइकांनीही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, पोलिस निरीक्षक वसंत कांबळे व सहका-यांनी जमावाची समजूत काढली. त्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.
बसचालक अटकेत : मुलाचे मामा विलास विष्णू भवर यांच्या फिर्यादीवरून चालक वैजनाथ चत्रभुज याच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
बसचालकाचे लक्ष भलतीकडेच
बसचालक आणि वाहक दोघे गप्पा मारत होते. चालकाचे लक्ष समोर रस्त्याकडे नव्हते म्हणून हा अपघात झाला असल्याचे प्रवाशांनी आम्हाला सांगितले. चालकाचे लक्ष बस चालवण्याकडे असते, तर हा अपघात झाला नसता.
अभिमन्यू भवर, उपसरपंच, झिरपी