आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाच्या "मलई'ने व्यापारीच गब्बर !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - दुधाला कमी दर मिळत असल्याने शेतक-यांवर दूध रस्त्यावर सांडण्याची वेळ आली आहे. उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे. मात्र, घसरलेल्या किमतीचा ग्राहकांनाही थेट फायदा सुरू झालेला नाही. ग्राहकांना अजूनही जुन्या (चढ्या) दरानेच दुधाची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे दूध विक्रेते, डेअरीचालक तुपाशी तर शेतकरी अन् ग्राहक उपाशी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भाजप शासनाने दूध पावडर उद्योगाची सबसिडी काढून घेतल्याने दुग्ध व्यवसायाला घरघर आली आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यांत दुधाचे दर सुमारे १० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एखाद्या वस्तू किंवा पदार्थांची किंमत कमी झाल्यानंतर त्यापासून बनवण्यात येणा-या उपपदार्थांच्याही किमती कमी हाेणे क्रमप्राप्त असते; परंतु दुधाच्या बाबतीत उफराटा नियम दिसून येत आहे. शेतक-यांनी उत्पादित केलेल्या दुधाला डेअरीचालकांकडून कमी भाव देण्यात येत आहे. अर्थात शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांनाही कमी दराने दूध मिळणे अपेक्षित आहे. तरीदेखील ग्राहकांना याचा लाभ सुरू झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. घसरलेल्या किमतीप्रमाणे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे.

सध्या दुष्काळी स्थिती असल्याने पशुधन कसे जगवावे, हा प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे. अशात शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेकांनी दुग्ध व्यवसायाची कास धरलेली आहे. दुष्काळात हा व्यवसाय टिकवून ठेवण्याचे आव्हान शेतक-यांसमोरआहे. अशात दुधाचे दर कमी मिळत असल्याने हा व्यवसायच कोलमडून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत लिटरमागे शेतक-यांना किमान १० रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. कमी दर मिळत असल्याने दुभती जनावरे बाजारात विक्री करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची मागणी शेतक-यांतून करण्यात येत आहे.

फॅटनुसार दर
-३.५ फॅट व ८.५ एसएनएफ (पाण्याचे प्रमाण) असल्यास गाईच्या दुधाला २० रुपये दर देण्यात येतो. अर्थात हे प्रमाण कमी असल्यास शेतक-यांना कमी दर देण्यात येतो.
-६.० फॅट व ९.० एसएनएफ असल्यास म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर २८ रुपये शेतक-यांना डेअरीचालकांकडून देण्यात येत आहेत; परंतु ग्राहकांना अजूनही जादा दराने दुधाची खरेदी करावी लागत आहे.
बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व औरंगाबाद येथील परिस्थितीही उस्मानाबादसारखीच आहे. ४० ते ५० रुपये लिटरने ग्राहकाला दूध खरेदी करावे लागते. प्रत्यक्षात दूधउत्पादकांच्या हाती काहीच पडत नाही.

शासनाने हस्तक्षेप करून उपाययोजना
दुधाचे दर कमी झाल्याने एकीकडे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे एक लिटर दुधासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतक-यांसह ग्राहकांची पिळवणूक होत आहे. यामध्ये शासनाने हस्तक्षेप करून शेतकरी व ग्राहकांना योग्य दर मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.''
प्रा. आश्रुबा कदम, ग्राहक.