आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Commits Suicide; Police Administration Only Relented Sonapetha

व्यापारी आत्महत्या; जनांदोलनापुढे सोनपेठमध्ये पोलिस प्रशासन नरमले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - सोनपेठमधील जनतेने पोलिसी अत्याचाराविरोधात सुरू केलेल्या तीव्र आंदोलनामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन सोमवारी (दि.१३) सोनपेठमध्ये दाखल होत शांतता समितीच्या बैठकीच्या माध्यमातून आपली मवाळ भूमिका जाहीर करीत यापुढे कोणालाही विनाकारण अटक केली जाणार नसल्याचे प्रशासनाने तोंडी आश्वासन दिल्याने तूर्त जनतेने आंदोलन मागे घेतले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

युवक व्यापारी विठ्ठल हाके याच्या आत्महत्येनंतर उद्भवलेल्या जनतेच्या उद्रेकानंतरही पोलिसांनी उलटच बडगा उभारला. नागरिकांची धरपकड करण्यास सुरुवात केल्याने सर्व पक्ष, संघटनांनी शनिवारपासून (दि.११) पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. सोनपेठ पोलिस ठाण्यावरील हल्ला प्रकरणात निष्पाप लोकांना व अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी अटक केल्याने जनतेचा पोलिसांवरील रोष अधिकच वाढला. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या बैठकीत सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्यात आला.

तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. जनतेचा रोष लक्षात घेऊन महसूल व पोलिस प्रशासनाने शांतता बैठक घेऊन तडजोडीची भाषा वापरल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस प्रशासनाची
बैठकीतील भूमिका अतिशय मवाळ असल्याचे दिसून आले.
तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनी यापुढे अशा पद्धतीने कोणालाही अटक न करता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच कारवाई केली जाईल, असे तोंडी आश्वासन दिले, परंतु पोलिसांच्या जाचामुळे विठ्ठल हाके आत्महत्येप्रकरणाविषयी कुठलेही भाष्य करण्यास त्यांनी टाळले. सोमवारी आठवडी बाजार असतानाही बंदमुळे शुकशुकाट होता.
संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली.

पोलिसांनी अटक केलेल्या ३३ आरोपींना सोनपेठ न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश देण्यात आले.
परभणीत भाकपचे आंदोलन

परभणीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोनपेठ प्रकरणी पोलिसांचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर व्यापारी विठ्ठल हाके याच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करीत या प्रकरणास जबाबदार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. भाकपचे नेते राजन क्षीरसागर, संदीप सोळुंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्यानंतर २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

सोनपेठमधील विठ्ठल हाके आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करून दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वात निदर्शने केली.
छाया : योगेश गौतम