आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवासातील हस्तक्षेपामुळे देखणी फुलपाखरे संकटात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जंगलाचा ऱ्हास, शहरीकरण अन‌् वाढत्या प्रदूषणाने फुलपाखरांच्या देखण्या विश्वावर टांगती तलवार आणली असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत करताना आपल्या अस्तित्वाने सृष्टी लावण्यास फुलवणार्‍या या जीवांच्या रक्षणासाठी अभयारण्याची जपणूक करणे व ती वाढवणे गरजेचे झाले आहे.

फुलपाखरांच्या प्रजातींत भारताचा जगात आठवा क्रमांक लागतो. पूर्वी फुलपाखरांबद्दल फारसे आकर्षण नव्हते. तथापि, ब्रिटिशांच्या राजवटीत मात्र यावर मोठा अभ्यास झाला. आपल्या देशात या जीवांच्या जेमतेम ४० प्रजाती पाहिलेले इंग्रज भारतातील हजारो प्रजाती पाहून अक्षरश: वेडे झाले. अनेकांनी त्यांच्या शिकारी करून त्या आपल्या दिवाणखान्यात व संग्रहात फ्रेम करून ठेवल्या. काहींनी पुस्तकेही लिहिली. यानिमित्ताने फुलपाखरांच्या अभ्यासासाठी देशात एक पाऊलवाट तयार झाली. पुढे इंग्रजांच्या या छंदाचा संसर्ग भारतातील बड्या असामींनाही झाला. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जंगले नष्ट झाली. औद्याेगिकीकरणामुळे प्रदूषणाने सर्व स्तरांत संचार केला. शेतीत कीटकनाशकांचा वापर वाढला व एक प्रकारे आहार विषमय झाला, तर अधिवास संकटात गेला. त्यामुळे फुलपाखरांचे स्वच्छंदी जीवन संकटात सापडले.

फुलपाखरांनाही आहे कायद्याचे संरक्षण
फुलपाखरांना १९७१ च्या वन्यजीव कायद्याआधारे संरक्षण देण्यात आले आहे. त्यांची शिकार करणे वा व्यापार करणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतातील कैसरे हिंद, भूतान ग्लोरी व अपोलो यांसारख्या फुलपाखरांना जगात मोठी मागणी आहे. ही फुलपाखरे वाळवून प्रतिष्ठेचे द्योतक म्हणून ती शोकेसमध्ये ठेवली जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अपोलो जातीच्या एका फुलपाखराला १०० डाॅलरपर्यंत किंमत मिळते. त्यामुळे फुलपाखरांचा चोरटा व्यापार वाढला होता. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे आता मात्र त्यावर बर्‍यापैकी नियंत्रण आले आहे. अशा फुलपाखरांची शिकार वा व्यापार करणार्‍यास आठ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

भारतात १५०० प्रजाती अिस्तत्वात
जगात फुलपाखरांच्या १८ हजार विविध प्रजाती आहेत. त्यापैकी १५०० प्रजाती भारतात आढळतात. त्यातील सर्वाधिक प्रजातींचा अधिवास जंगलात आहे. आसाम, मेघालयात ९००, तर पश्चिम घाटात ३३६ प्रजातींचा अधिवास आहे. हिमालयातही त्यांचा वावर आहे. विशेष म्हणजे अपोलो या प्रजातीची फुलपाखरे हिमालयात १८ हजार फुटांवर राहतात. जुलै ते आॅगस्ट महिन्यात हिमालयात फुलांचा बहर असतो, त्या वेळी मोठ्या संख्येत अपोलोचे दर्शन होते.

फुलपाखरे स्वच्छ पर्यावरणाचे दिशादर्शक
भारतात जंगलात अधिवास असणार्‍या फुलपाखरांची संख्या मोठी आहे. तथापि, शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास झाल्याने फुलपाखरांच्या अधिवासावर संकट ओढवले असून त्यांची संख्या रोडावली आहे. फुलपाखरे ही स्वच्छ पर्यावरणाचे दिशादर्शक आहेत. परागीभवनात त्यांचे योगदान मोठे असते. त्यांच्या अस्तित्वाने निसर्ग अधिक लोभस होतो. - आयझॅक किहीमकर, आंतरराष्ट्रीय फुलपाखरू अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...