आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Call Me When He Thought Of Suicide : Nana Patekar

अात्महत्येचा विचार आला तरी मला फोन करा : नाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची परिस्थितीच येऊ नये, याची जबाबदारी सर्वांवर आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.आभाळातील बापाला मी दोष दोऊ शकत नाही. पण मी देवाला प्रार्थना करेन, तू सारखे बरसत राहा. शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या मार्गाकडे वळू नये. तसा विचार जरी मनात आला तर एकदा मला फोन करा. तुम्ही पुन्हा आत्महत्येचा विचार मनात आणणार नाहीत, असा भावनिक दिलासा सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना दिला.
बीडमध्ये रविवारी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे अादींच्या हस्ते ११२ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १३ हजारांप्रमाणे १४.५६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमानंतर नाना म्हणाले, शेतकरी आत्महत्या करतोय याची जाणीव शहरी माणूस असो की ग्रामीण,

प्रत्येकाला असलीच पाहिजे. माझी गरज होती म्हणून मी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बीडला आलो. मला फक्त नमस्कार करायचा होता. कार्यक्रमात बोलायचे नव्हते, असे चित्रपट अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगितले.

सरकारला मदत मागितली तर टॅग लागतो :
नाना म्हणाले, कार्यक्रमाला येणारी प्रत्येक मुलगी, बहीण माझी वाट पाहत होती. तिच्या कपाळावर दुसरे कुंकू मी चिकटवू शकत नाही. माझ्या मदतीने त्यांचा भार थोडा कमी होईल; पण गेलेला माणूस परत येणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकार विचार करू शकेल असे वाटत नाही. मी कुठल्याच पक्षाचा नाही. मला सरकारकडे काही मागायचे नाही. कारण मागितले तर टॅग लागतो.

फडणवीस सरकारला हात जोडून विनंती :
फडणवीस सरकारला मी हात जोडून विनंती करतो. शेतकऱ्यांना हात जोडण्याची तुम्ही वेळ आणू नका. शेतकऱ्यांना जे अर्थसाहाय्य देता ते मदत म्हणून समजू नका. शेतकरी हा मूळ आहे. त्याचे सिंचन करा. त्याला वेळेत मदत करा. झाड पडले तर देश पडल्याशिवाय राहणार नाही.

‘एका साध्या सत्यासाठी’
मराठवाडा-विदर्भाच्या अनाथ शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने ‘एका साध्या सत्यासाठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळींच्या मदतीने गोळा झालेल्या निधीतून १७२ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत दिली जात आहे.

बीड जिल्ह्यातील ११२ कुटुंबांना १३ हजारांप्रमाणे १४.५६ लाखांची मदत

हे उपकार नव्हे, जबाबदारी
आपल्या घरावर शेतकरी आत्महत्येचे दुर्दैव आले नाही म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. शेवटी समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. म्हणून मदत करत आहोत. हे काही या कुटंुबीयांवर आम्ही केलेले उपकार नाहीत, आपण समाजाचे भाग असल्याने ही माझी जबाबदारी होती, असे नाना म्हणालेे.जालना, औरंगाबादेत येऊ
बीड शहरात रविवारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्यात आली. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद व विदर्भातील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी या वेळी सांगितले.

मकरंद हाच प्रणेता
आम्ही मूठभर शहरी लोक आहोत. शेतकऱ्यांना मदत करण्याची चळवळ सुरू झाली पाहिजे. या चळवळीचा प्रणेता मकरंद आहे. मी माझ्यापुरता मर्यादित नाही. मुळात आत्महत्या का होतात? ज्यांच्या घरी अशा आत्महत्या होतात, त्यांना मदत करावी लागते हे दुर्दैव आहे. यात मग सरकार काय करते, याकडे लक्ष देऊ नये. आपल्याला काय करता येईल ते आपण करावे.

अाज टिकल्या विकणारा बिझनेसमन आहे. पण देशाला धान्य पुरवणारा शेतकरी नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शहरातून वानोळा घेऊन आलोय.
- मकरंद अनासपुरे