आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidates Use Social Media For Election Propagand, Divya Marathi

उमेदवारांची प्रचारकी डोकॅलिटी, समर्थकांकडून सोशल मीडियाचा वारेमाप वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - उमेदवार अथवा राजकीय पक्षासाठी आयोगाच्या आचारसंहितेची लक्ष्मणरेषा असली तरी सोशल मीडियावरून त्यांचे चाहते करीत असलेल्या प्रसिद्धीला हे बंधन नसल्याने सोशल मीडियावरून प्रसिद्धीचा वारू वारेमाप दौडत आहे. कमी खर्चात व कसलाही अंकुश नसलेल्या या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा चंग उमेदवार, राजकीय पक्षासह अपक्षांनीही बांधला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षाच्या पेड न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय प्रसिद्धी माध्यम, प्रमाणन व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टिफिकेशन अण्ड मॉनिटरिंग कमिटी - एमसीएमसी) गठित करण्यात आली आहे. ती जिल्हास्तरावरील सर्व वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांची दैनंदिन छाननी करीत आहे. संशयास्पद प्रकरणे समितीच्या निदर्शनास आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित उमेदवारास नोटीस बजावणार आहेत, परंतु त्यांच्या गळाला अद्याप एकही वर्तमानपत्र वा इलेक्ट्रॉनिक माध्यम लागले नाही. विशेष म्हणजे याबाबत नागरिकांतून एकही तक्रार आली नसल्याचे लातूरच्या समितीचे सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी सांगितले. २५ ऑक्टोबर २०१३ रोजी सोशल मीडियासंबंधी आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तथापि, ती उमेदवारासाठीच बंधनकारक आहेत.

उमेदवाराशिवाय अन्य कोणाही एखादा पक्ष अथवा उमेदवाराबाबत त्याचे उद्दात्तीकरण करणारी माहिती टाकली, छायाचित्रे दिली तर तो आचारसंहितेचा भंग ठरत नाही की ती बाब आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वात येत नाही. विशेष म्हणजे प्रसिद्धी माध्यम, प्रमाणन व संनियंत्रण समितीही त्यावर कार्यवाही करू शकत नाही.

विरोधकाला शिव्या घालण्यासह कलह वाढवणारा मजकूर
लोकशाही व विवेकी मार्गाने आपला विचार प्रक्षेपित केल्यास ती एखादा पक्ष व उमेदवारासाठी जमेची बाजू ठरू शकते. तथापि, उमेदवारांचे अनेक उतावीळ चाहते हिणकस प्रचार करत आहेत. विरोधकाला शिव्या घालण्यासह अवास्तव व कलह वाढवणारा मजकूर टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे असा प्रचार समाज वा राजकीय पक्षात वाद वाढवणारा ठरत आहे.

चाणाक्ष समर्थक
सोशल मीडियावरून माहिती, छायाचित्र, क्लिपिंग प्रक्षेपित करण्याबाबत नागरिकांना बंधन नाही, हे चाणाक्ष उमेदवारांनी अोळखले आहे. त्यामुळे ते आपले चाहते वा हस्तकांमार्फत त्यांचे म्हणणे पोहोचवत आहेत. अनेकांनी यासाठी खास माणसे नेमली आहेत. नागरिकाचे अकाउंट असले तरी यामागची डोकॅलिटी उमेदवारांची आहे, हे विशेष.

उमेदवारासाठी बंधन
नामनिर्देशन करताना उमेदवारांनी सोशल मीडियाच्या लेखांचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप वा अन्य सोशल नेटवर्कवर उमेदवाराला स्वत:ची जाहिरात, माहिती टाकायची असेल तसेच एसएमएसही करायचा असेल, तर त्याची समितीकरवी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. ती न घेता माहिती, जाहिरात टाकल्यास अथवा एसएमएस केल्यास ते नियमांचे उल्लंघन ठरू शकते. उमेदवारासाठी हे बंधन आहे. आम नागरिकाने त्याचे विचार व्यक्त केल्यास अथवा त्या माध्यमातून त्याने आवाहनही केल्यास तो आचारसंहितेचा भंग होत नाही.
- शिरीष मोहोड, उपमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य