आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पकडलेल्या टिप्परचे नंबर खोडून चालकाचे पलायन; एकाच रात्री वाळूचे चार टिप्पर पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- माजलगाव तहसीलदारांचे आदेश येताच महसूल विभागाच्या पथकाने एकाच रात्री वाळू तस्करी करणारे चार टिप्पर पकडले. परंतु टिप्पर कुणाचे हे ओळखू येऊ नये म्हणून पकडलेल्या  चार पैकी तीन टिप्परचे नंबर खोडून चालकांनी रातोरात पलायन केले. आता या टिप्परच्या मालकांचा शोध घेण्यासाठी तहसीलदारांनी चक्क आरटीओला पत्र दिले आहे. माजलगाव तालुक्यातील नागडगाव फाटा येथे  गुरुवारी पहाटे महसूलच्या पथकाने ही कारवाई करत  १ लाख ४४ हजार रुपयांची २४ ब्रास वाळू जप्त  केली आहे.    

माजलगाव तालुक्यात हिवरा, कवडगावथडी , रिधोरी, सेलगावथडी, बोरगाव, आंबेगाव , मंजरथ, सांडसचिंचोली, नागडगाव  रोषणपुरी  येथे सिंदफणा व गोदावरी नदीत  वाळूचे पट्टे आहेत.   या नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरूच असून  महिन्यापूर्वीच सांडसचिंचोली, नागडगाव, रोषणपुरी येथील ग्रामस्थांनी  सिंदफणा नदीपात्रात उपोषण करत वाळू वाहतूक  थांबवून  वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली केली होती. तेव्हा माजलगावच्या महसूल विभागाने लहान -सहान कारवाया केल्या होत्या. काही दिवस निघून जाताच  वाळूमाफियांनी पुन्हा तस्करी सुरू  केली. ग्रामस्थांच्या तक्रारी येताच माजलगाव येथील  तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांनी महसूल पथकातील अधिकाऱ्यांना   वाळू वाहतूक  करणारी  वाहने जप्त करण्याचे आदेश दिले. दरम्यान   गुरुवारी पहाटे  वाळू वाहतूक  करणारे  चार टिप्पर तालुक्यातील नागडगाव  येथील शिंपेटाकळी पुलावर पकडण्यात आले. चारही टिप्परमध्ये जवळपास २४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. एक टिप्पर बंद पडल्याने  जागेवरच दिसून आले . अन्य तीन टिप्पर गुरुवारी दुपारी महसूल व पोलिसांच्या पथकाने जप्त केले आहेत. ही कारवाई   मंडळ अधिकारी व्ही.एम.टाकणखार, ए.डी.देशमुख, तलाठी पद्माकर मुळाटे, सोपान वाघमारे, चिलवंत, आभारे, यांनी केली.
 
टिप्परचे क्रमांक ओळखू येईनात
चालकांनी टिप्परवरील क्रमांक खोडल्याने वाहने नेमकी वाहने कुठली याची ओळख  महसूल विभागालाच पटली नाही. महसूल प्रशासनाने आता वाहनांची ओळख पटवण्यासाठी आर.टी.ओ.कार्यालयास पत्र पाठवले आहे.
 
दंडात्मक कारवाई करणार
चारही टिप्पर जप्त करण्यात आले असून या टिप्पर चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. टिप्परचे नंबर ओळखण्यासाठी आम्ही आरटीओंना पत्र दिलेले असून लवकरच छडा लागेल. - एन.जी.झंपलवाड, तहसीलदार, माजलगाव
बातम्या आणखी आहेत...