आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातुरात अाडत बाजार कॅशलेस, शेतकरी स्वत: घेऊन येऊ लागले बँकेचे पासबुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - तीन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर चलनतुटवडा होऊन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार पूर्णत: कोसळले होते. परंतु आता जवळपास ५० टक्के व्यवहार सुरू झाले असून, आडते शेतकऱ्यांना आरटीजीएसद्वारे पेमेंट करू लागले आहेत. त्यासाठी शेतकरी स्वत:च बँकेचे पासबुक घेऊन येऊ लागले आहेत.

शंभर, पन्नास रुपयांचा चलन तुटवडा निर्माण झाल्याने सुरुवातीच्या काळात लातूरच्या मार्केट यार्डातील व्यवहार प्रभावित झाले होते. उलाढाल अवघ्या १० टक्क्यांवर १० ते १०० रुपयांच्या चलनावर सुरू होती. काही प्रगतिशील शेतकरी चेकद्वारेही रक्कम स्वीकारत होते. तरीही ९० टक्के व्यापार बसला होता. त्यामुळे सगळ्याचींच कोंडी झाली होती. काही शेतकऱ्यांनी बाजार समितीने सुरू केलेल्या शेततारण योजनेअंतर्गत सोयाबीन तारण ठेवून मिळणाऱ्या रकमेतून आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न केला होता. पण आता ऑनलाइन बँकिंग पद्धत शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडू लागल्याने कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने हे एक दमदार पाऊल ठरणार आहे. चलनतुटवड्यामुळे व्यवहार ठप्प झाल्याने लातूर बाजार समिती प्रशासनाने राज्याच्या पणन संचालकांशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी आडत व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून आर्थिक व्यवहार चेक, डीडी, एनईएफडी, आरटीजीएस, इंटरनेट बँकिंगमार्फत करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कॅशलेस व्यवहाराला गती मिळत आहे. हंगाम असल्याने लातूरच्या बाजारात मोठी उलाढाल आहे. नोटाबंदीच्या अगोदर दिवसाला जवळपास ४० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीला येत होते. पण चलनतुटवड्यामुळे त्यात घट आली आहे. मंगळवारी अमावास्येमुळे मार्केट यार्ड बंद होते. रविवारी बाजाराला सुटी होती तर सोमवारी काही राजकीय पक्षांनी बंदचे आवाहन केल्यामुळे आवक मंदावली. सोमवारी जवळपास २५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. त्याला २९०० रुपयांचा भाव मिळाला.

थेट खात्यावर पैसे जमा :
एक लाखाच्या पुढची रक्कम आरटीजीएसद्वारे दुसऱ्याच्या खात्यावर वर्ग करता येते. त्यानुसार आडते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चेक घ्या, तो बँकेत रांगेत उभे राहून डिपॉझिट करण्याची कटकट नाही. आरटीजीएस झाल्यानंतर काही मिनिटांच्या आत शेतकरी पैसे काढू लागले आहेत. एक लाखाच्या आतील रक्कम मात्र आडते एनइएफटीद्वारे देऊ लागले आहेत. परंतु या प्रक्रियेत शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी हातात रक्कम मिळू लागली आहे.
आरटीजीएस व एनईएफटी - सुलभ व सुरक्षित
आरटीजीएस व एनईएफटी हे एका खात्यातून, ठिकाणाहून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवण्याचे सुलभ व सुरक्षित पर्याय आहेत. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट-आरटीजीएस, याद्वारे पाठवलेले पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होतात. एक लाख किंवा त्यापेक्षा रकमांसाठी हा पर्याय उत्तम आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर-एनईएफटी, हा पर्याय मुख्यत: एक लाखांपेक्षा कमी रकमांसाठी वापरला जाणारा पर्याय आहे. यात दुसऱ्या दिवशी खात्यात पैसे जमा होतात. पाच लाख रुपयांपर्यंत प्रतिव्यवहार २५ ते ३० रुपये कमिशन आकारण्यात येते. एनईएफटीसाठी अटी वगळता कमिशन नाही.
बातम्या आणखी आहेत...