आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पशुधनासह मालकही छावणीच्या आस-याला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - कवठा.... लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे गाव. सध्या चर्चेत आले आहे ते जनावरांच्या छावणीमुळे. भूकंपग्रस्त किल्लारीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव तसे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात येते. मात्र, गावचा सर्व व्यवहार किल्लारी-लातूरशीच होतो.


कितीही मोठा दुष्काळ असला तरी माणूस जगतो. प्रश्न असतो तो मुक्या जनावरांचा. प्रशासनाला दुष्काळ दिसत नाही, शेतक-यांना त्याचे चटके सोसवत नाहीत. दुष्काळाचा दाह जसजसा वाढतो आहे, तशी माणसांची जनावरांविषयीची आस्था कमी होत चालली आहे. जनावरे विकून शेतकरी गुजराण करीत आहेत ही वस्तुस्थिती. परंतु अशाही स्थितीत नकोशा झालेल्या, पोटं खपाटीला गेलेल्या जनावरांना दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मायेची सावली दिली जात आहे. जनावरे जगली नाहीत तर शेती टिकणार नाही; म्हणून विनायक पाटील यांना जनावरे जगवण्याचा ध्यास लागला अन् त्यातून त्यांनी कवठ्यात मोफत छावणी सुरू केली.


या छावणीला भेट दिली तेव्हा तिथल्या शिस्तीचं अप्रूप वाटलं. इथले व्यवस्थापक बलभीम जगताप म्हणाले, ज्या शेतक-यांनी या छावणीत आपली जनावरे आणली आहेत, त्या जनावरांचे दूध आणि शेण हे त्यांच्याच मालकीचे असते. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती दररोज तिथे मुक्कामाला राहते. आपापल्या जनावरांचे दूध काढणे आणि ते स्वत:च्या घरापर्यंत घेऊन जाणे ही कामे ते स्वत:च करतात. जनावरांना पाणी पाजणे, शेडमध्ये बांधणे अशी कामे पशुमालक करीत असतात.


दोन एकर शेतीचे मालक असलेल्या रामहरी गायकवाड यांनी जोडधंदा म्हणून जर्सी गायपालनाचा व्यवसाय सुरू केला. शेतीत चारा उत्पादन करायचा आणि त्यावर गायी सांभाळायच्या असे त्यांनी ठरवले. मात्र, पाण्याअभावी चारा झाला नाही. त्यांच्याकडे 10 गायी असल्याने त्या कशा पोसायच्या याची चिंता होती. ती कवठ्यातील छावणीमुळे दूर झाली. जनावरांच्या चा-या-पाण्याला एक छदामही घेतला नाही आणि दुधाचेही उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे दुष्काळ सुसह्य झाला आहे, असे सांगताना त्यांना गहिवरून आले. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या छावणीत दररोज दीड लाख रुपयांचा खर्च होत असून गेल्या दीड महिन्यापासून कवठ्यात जनावरे जगवण्याची धडपड सुरू आहे. पन्नास-साठ माणसे दिवसभर राबत असतात. तीन कडबाकुट्टी यंत्रे उसाची कुट्टी करण्यात व्यग्र असतात. लाइट गेली की जनरेटरच्या मदतीने काम सुरू असते. बार्शीच्या बाजारपेठेतून महिनाभर पुरेल एवढी कडब्याची कुट्टी नऊ रुपये किलो दराने विकत आणली आहे. सरकारी छावण्यांत 15 किलो चारा जनावरांना दिला जातो त्यामुळे जनावरे उपाशी राहतात. रात्रभर हंबरडा फोडतात. मात्र कवठ्याच्या मोफत छावणीत उसाची आणि कडब्याची अशी प्रत्येकी 10-10 किलो कुट्टी एकत्र करून जनावरांना दिली जाते. तसेच पौष्टिक आहार म्हणून दररोज एक किलो चंदीही दिली जाते. परिसरातल्या 250 शेतक-यांची दोन हजार जनावरे सध्या या छावणीत आहेत. मुळात तिथली क्षमता एक हजार जनावरांची आहे. विनायक पाटील यांच्या शेतातील विहिरी आणि बोअर कोरडे पडल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्यांचे बंधू शहाजीराव पाटील यांनी आपल्या 10 एकर उसाचे पाणी थांबवले आणि ते छावणीतल्या जनावरांसाठी खुले केले. या छावणीत रमेश माने यांची तीन जनावरे आहेत. या जनावरांचे दूध तर आम्ही नेतोच, त्याचबरोबर शेणखतही आम्हीच नेतो. छावणीत काहीही ठेवून घेतले जात नाही. माझ्यासारख्या अडीचशे शेतक-यांची दोन हजार जनावरे तग धरून आहेत. आजघडीला ही जनावरेच आमची संपत्ती आहे. त्यामुळे एक प्रकारे या छावणीत खरे तर आम्हीच जगतो आहोत असे वाटते, असे ते म्हणाले.
सावलीसाठी चार लाखांचे ग्रीन नेटशेड
या छावणीत गायी, म्हशी, बैल, वासरे अशी दोन हजार जनावरे आहेत. त्यांना दिवसभर सावली मिळावी यासाठी ग्रीन नेटशेड लावण्यात आले आहे. त्याच्या उभारणीचा खर्च सुमारे चार लाख रुपये इतका झाला आहे.
गाव : कवठा (जि. उस्मानाबाद)
लोकसंख्या : 2500
अंतर : लातूरपासून
55 किलोमीटर
प्रमुख पिके : सोयाबीन, ऊस, मूग, उडीद
कवठा छावणीची स्थिती
एका जनावराला दररोज 10 किलो कडबाकुट्टी, 10 किलो वाढ्याची कुट्टी, 1 किलो चंदी आणि 3-4 वेळेस पाणी दिले जाते.
2000लहान-मोठी जनावरे
08टँकर पाणी दररोज लागते
2000रुपयांचे डिझेल जनरेटरसाठी
50 कामगार दररोज छावणीत कामावर
05 हजार रुपये पगार प्रत्येक कामगाराला