आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट काम: पहिल्याच पावसात सिमेंट बंधाऱ्याला लागली गळती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जलयुक्त शिवारच्या कामाचा खुद्द ग्रामविकास मंत्र्यांकडून एकीकडे डांगोरा पिटला जात असला तरी दुसरीकडे त्यांच्याच जिल्ह्यात या कामाचा कसा बाेजवारा उडाला आहे, हे लिंबारुई गावातील बारा लाख रुपये खर्चाच्या सिमेंट बंधाऱ्याला पहिल्याच पावसात लागलेल्या गळतीमुळे समोर आले आहे.

बंधाऱ्यात चक्क दगडगोटे भरण्यात आल्याचा अहवाल लघु पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला खरा; पण जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही गुन्हा नोंदवला गेला नाही. आता सीताई कन्स्ट्रक्शनचे बिल रोखले जाणार आहे.

बीड तालुक्यातील लिंबारुईत जलयुक्त शिवार अभियानातून १२ लाख रुपयांचा सिमेंट बंधारा मंजूर करण्यात आला. लघु पाटबंधारे विभागाने हे काम सीताई कन्स्ट्रक्शन या एजन्सीला दिले. एजन्सीने काम करताना बंधाऱ्यात चक्क दगडगोटे टाकून मे २०१६ ला काम पूर्ण केले. बंधाऱ्यात दगडगोटे वापरण्यात आल्याने दीड महिन्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाला चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर या सिमेंट बंधाऱ्यामध्ये दगडगोटे असल्याचा अहवाल बीड येथील लघु पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तेव्हा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यांनी लघु पाटबंधारे विभागाला गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. बंधारा बांधणाऱ्या संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही दिले. या सिमेंट बंधाऱ्याचे पाणी ओसंडून जाण्यासाठी भिंतीची उंची शेजारी असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतापेक्षा फूट उंच आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचले की थेट शेजारील शेतात घुसून नुकसान होत आहे. कारण बंधाऱ्याचे आवश्यक ते खोलीकरण केले नाही. लिंबारुई परिसरात ११ जून रोजी झालेल्या पावसामुळे हा सिमेंट बंधारा पहिल्याच पावसात गळू लागला आहे. दगडगोटे टाकून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे बिंग फुटले आहे.

दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील लिंबारुई येथील जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यात दगडगोटे भरून हे काम करण्यात आले. (दुसऱ्या छायाचित्रात) निकृष्ट काम झाल्यामुळे पहिल्याच पावसात सिमेंट बंधाऱ्यातून पाणी पाझरून वाया जात आहे.

गुणवत्तापूर्ण काम झाल्यावर पेमेंट
> सिमेंट बंधाऱ्यातगुत्तेदाराने दगड भरल्याचे आमच्या पाहणीत दिसून आले असून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अहवालही दिला आहे. या कामाचे बिल अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पूर्ण गुणवत्तेचा बंधारा झाल्यानंतरच पेमेंट करण्यात येईल.
- विलास कोटेचा, वरिष्ठअभियंता, लघु पाटबंधारे

कारवाई करावी
>लिंबारुई ग्रामस्थांची अधिकारी गुत्तेदाराने फसवणूक केली असून भविष्यात अधिकारी गुत्तेदार राजकीय नेत्यांच्या शिफारशीने बिले काढून मोकळे होतील. त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी अशांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
-गणेश ढवळे, सामाजिककार्यकर्ते, बीड