आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीने अभ्यास करा अन‌् मोठे अधिकारी व्हा : प्रेरणा देशभ्रतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - स्पर्धा परीक्षेची तयारी करून विद्यार्थ्यांनी आपले चांगले करिअर घडवावे. यासाठी उच्च ध्येय ठेवत ते प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. परीक्षेच्या तयारीसाठी अद्ययावत ग्रंथालय, अभ्यासिका, मार्गदर्शकाची प्रशासनाकडे मागणी करावी. जिद्द व अात्मविश्वासाने अभ्यास करा, मोठे अधिकारी व्हा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.

"एकच ध्यास करू अभ्यास' या उपक्रमाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. १४ एप्रिल २०१४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभ्रतार यांच्या पुढारानेच हा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला होता. या वेळी औरंगाबाद येथील सहआयुक्त (कस्टम अँड एक्साइज) प्रशांत पाटील, डेप्युटी सीईओ मुकीम देशमुख यांच्यासह प्रोबेशनरी डेप्युटी सीईओ दिगंबर लोखंडे, विजय इंगळे, बीडीअो रणजितसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सीईओ देशभ्रतार म्हणाल्या, माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे. वडील पोलिस सेवेत असल्यामुळे त्यांची बदली होत असे. त्यामुळे मराठवाडा, काेकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी शिक्षण पूर्ण करावे लागले. पुढे शासकीय महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. मात्र, प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, दोनवेळा अपयशसुद्धा आले. मात्र, मनात जिद्द कायम ठेवली. यामुळे मी २००७ मध्ये "आयआरएस' तर २००९ मध्ये "आयएएस' पदावर येऊ शकले. त्यामुळे अपयशाने खचून न जाता प्रत्येकाने ध्येय निश्चित करून ते मिळेपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी या वेळी सांगितले.

बातमी ही माहितीचा स्रोत
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत होत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. वर्तमानपत्रे तसेच इलेक्ट्राॅनिक माध्यमातील बातमी ही माहितीचा मुख्य स्रोत असते. ही माहिती ज्ञान मिळवण्यासोबतच स्पर्धा परीक्षेतही उपयुक्त ठरेल, या दृष्टीने वाचन करावे. तसेच इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या विषयांचा अभ्याससुद्धा अशाच पद्धतीने करावा, असे देशभ्रतार म्हणाल्या.