आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीमुळे कळले जगणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना समाजाच्या पाठबळाची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शाळेत वडील नसलेल्या मुलांची एकेदिवशी वेगळी रांग करण्यात आली होती आणि छोट्या मुलीने ती पाहिली होती. वडिलांच्या आत्महत्येनंतर तिने आता मलाही वेगळ्या रांगेत उभं करणार का, हा प्रश्न विचारला आणि इथून पुढे जगण्यासाठी आपल्यासमोर किती प्रश्न आहेत याचा अंदाज आला. आर्थिक मदतीपेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना समाजाच्या पाठबळाची गरज असल्याची भावना केज येथील ज्योती महादेव मोराळे "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दिलेली मदत स्वीकारण्यासाठी आलेल्या केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथील ज्योती महादेव मोराळे यांनी व्यासपीठावर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि काही वाक्य बोलल्यानंतर ताण असह्य झाल्याने त्या चक्कर येऊन व्यासपीठावरच कोसळल्या. गीतकार अरविंद जगताप यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांना सावरत शुद्धीवर आणले. १ जून रोजी महादेव मोराळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या म्हणाल्या, दोन एकर शेती तीही कोरडवाहू, जमीन फुलेल म्हणून कर्ज काढलं, पण दुष्काळानं सुखस्वप्नांवर पाणी फेरलं आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या माझ्या पतीने गळफास घेऊन दुष्काळ आणि कर्जातून एकदाची मुक्ती मिळवली. दोन मुली, मुलगा यांच्यासाठीच आता जगते आहे; पण समाजातून पाठबळ मिळण्याची गरज आहे. आर्थिक मदतीने काही प्रश्न सुटतील, पण तात्पुरते. कायमस्वरूपी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नोकरी किंवा रोजगाराची गरज आहे. तरच प्रश्न सुटण्यास मदत होईल. छोटा हर्षद आता तिसरीत आहे, मधली अनुजा पाचवीत, तर मोठी क्षितिजा
आठवीत आहे.

मराठी शाळेत मुलांचे शिक्षण असले तरी शिक्षणासाठी खर्च येतोच, इतरही अनेक प्रश्न समोर आ वासून उभे आहेत. केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक प्रश्नही आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला समाजाने आधार देणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. समाज अाम्हाला अजून अडचणीत आणण्याचेच प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. कुणावरही अशी वेळ येऊ नये, असे सांगत ज्योती मोराळे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

"क्रांतिवीर'मधील डायलॉगने प्रेरणा
व्यासपीठावर बोलण्याचे धाडस हे नाना पाटेकरांच्या क्रांतिवीर चित्रपटातील संवादाने आले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आजची मदत महत्त्वाची असून अनेकांचा दिलासा यामुळे मिळाला आहे. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मोराळे म्हणाल्या.

मदतीआधीच घेतला निरोप
धोत्रा (ता. केज) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी राजाभाऊ उत्तम जाधव यांचे वडील उत्तम जाधव हेसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. २२ जून रोजी त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतर हाय खाल्ल्याने ७० वर्षीय उत्तम जाधव हे आजारी पडले आणि मदतीचा धनादेश स्वीकारण्यापूर्वीच रविवारी सकाळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांमध्येच पित्याचाही मृत्यू झाल्याने जाधव कुटुंब उघड्यावर आले आहे.