आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आई राजा उदो उदो’च्या गजरात लाखो भक्तांनी घेतले तुळजापूरच्या देवीचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - हलगी, झांजच्या तालावर "आई राजा उदो उदो'चा गजर करत चैत्र खेटा पूर्ण करण्यासाठी लाखो भाविकांची हजेरी लावल्याने तुळजापुरात शनिवारी (दि. ४) भक्तीचा महापूर आला. या वेळी देवीची गाणी गात आराधी मंडळींनी ठेका धरल्याने तुळजाईनगरी फुलली होती.
तुळजाभवानी नवरात्रोत्सवानंतरची सर्वात मोठी चैत्र यात्रेसाठी शुक्रवारी (दि. ३) सायंकाळपासून भाविकांचे घोळके शहरात दाखल होत होते.
शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्ते भाविकांनी फुलले होते. वर्षाचा पारंपरिक चैत्र खेटा पूर्ण करण्यासाठी भाविकांची लगबग होती. हलगीच्या तालावर वाजतगाजत भाविकांचे घोळके शहरात दाखल होत होते. या वेळी देवीच्या गाण्यांवर पारंपरिकपणे फेर धरत भाविक दाखल होत असल्याने तुळजापुरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही वर्षांत लोप पावत असलेली ही परंपरा या वर्षी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
चैत्र पौर्णिमा व सलगच्या सुट्या यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानने विशेष उपाय योजले होते. यामध्ये दर्शन मंडपातून तासाभरात दर्शन, २२ तास भाविकांसाठी मंदिर खुले ठेवल्याने भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते. अभिषेक पूजेची गती वाढल्याने चैत्र पौर्णिमेचा विक्रमी भाविकांनी लाभ घेतला. नगरपालिकेने यात्रेची जय्यत तयारी केली होती. यावर पालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबणे महाद्वारसमोरील नियंत्रण कक्षातून, जातीने लक्ष ठेवून होते.
सोललेले नारळ विकल्याने दंड

यात्रा कालावधीत नारळ सोलून विकण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असतानाही सोलले नारळ विकल्याबद्दल विशाल पवार, रसूल तांबोळी व लक्ष्मण इंगळे यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावत दुकानांना सील ठोकले,तर दुकानासमोर डस्टबिन नसल्याबद्दल अयुसर सय्यद या दुकानदाराला ५०० रुपये दंड ठोठावला.