आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद मतदारसंघासाठी चाकूरकरांची ‘फील्डिंग’ !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले आणि सध्या पंजाबच्या राज्यपालपदावर असलेले शिवराज पाटील चाकूरकर राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने पुण्यात राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडून सोडवून घ्यावा आणि तेथून शिवराज पाटील चाकूरकरांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राहुल यांच्याकडे केली आहे.


लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा निवडून येण्याचा विक्रम नावावर असलेल्या चाकूरकरांना सन 2004 मध्ये पराभव पत्करावा लागला. मात्र, पक्षनिष्ठ असलेल्या शिवराज पाटलांना थेट गृहमंत्रिपद मिळाले. बॉम्बस्फोट झाल्यानंतर कपडे बदलण्यात व्यग्र असल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून चाकूरकर विजनवासात आहेत. त्यांना पंजाबच्या राज्यपालपदी नेमण्यात आले असले तरी त्यांच्या वास्तव्याचा बहुतांश काळ दिल्लीमध्येच असतो. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ते लातूरच्या स्थानिक राजकारणातही पडद्यामागून सक्रिय झाले आहेत. पूर्वी लातूर मतदारसंघात असलेल्या उमरगा आणि औसा या मतदारसंघांतील जातीय गणिते चाकूरकरांच्या बाजूने होती. आता हे दोन्ही मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत. त्यातच बार्शी हा मतदारसंघही जातीय गणितात चाकूरकरांनाच अनुकूल आहे. मात्र, सध्या उस्मानाबाद राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे आणि तेथे डॉ. पद्मसिंह पाटील खासदार आहेत. त्यामुळे जिल्हा पातळीवरून मागणी करून उस्मानाबाद काँग्रेसच्या वाट्याला घ्यायचे आणि दिल्लीतील वजन वापरून पक्षश्रेष्ठींना त्यासाठी राजी करायचे अशी खेळी चाकूरकर गटातून खेळली जात आहे. चाकूरकरांचे शरद पवारांशीही चांगले संबंध असल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.


चाकूरकरांच्या संमतीविना?
उस्मानाबादच्या जिल्हा काँग्रेसने राहुल गांधींजवळ हा विषय काढला. चाकूरकरांच्या परवानगीशिवाय हा विषय थेट राहुल गांधींकडे काढण्याचा प्रयत्न उस्मानाबाद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कधीच करणे शक्य नाही. त्यामुळे चाकूरकर सक्रिय राजकारणात परतणार असल्याचे हे संकेत असल्याचे राजकीय गोटात चर्चिले जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूमचे रहिवासी आणि औशाचे आमदार बसवराज पाटील तर चाकूरकरांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. विलासरावांच्या पश्चात पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनाही कुणीतरी गॉडफादर हवाच आहे. त्यामुळे तूर्त तरी सगळ्या बाबी चाकूरकरांना अनुकूल आहेत.


होय..मागणी केलीय
उस्मानाबाद पूर्वी काँग्रेसच्याच वाट्याला होता. येथून सातत्याने काँग्रेसचे खासदार विजयी झाल्याचा इतिहास आहे. सध्या आघाडी असली तरी जिल्हा परिषदेसह अनेक ठिकाणी काँग्रेसचे प्राबल्य आहे. चाकूरकरांसाठी तिकीट मागितले असे नाही, पण त्यांचा या भागात प्रभाव आहे, असे सांगितले. यात काही नाही.
अप्पासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस


जागा राष्‍ट्रवादीचीच
राष्‍ट्रवादीचे राज्यातील 9 खासदार आहेत. त्या जागा आम्ही सोडणार नाहीत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे जाहीर केले आहे. त्यामुळे या चर्चेला काहीही अर्थ नाही. उस्मानाबादची जागा राष्‍ट्रवादीची असून या जागेवर खासदार डॉ. पद्मसिंह पाटील हेच निवडणूक लढवतील.
-सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस, उस्मानाबाद.