आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chakurkar Play Politics ; Will Be Active In Latur's Politics

चाकूरकर रमले राजकारणात ; लातूरच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या मार्गावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर पुन्हा एकदा लातूरच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लातूरच्या दौ-यावर असलेल्या शिवराज पाटील यांनी या काळात पहिल्यांदाच प्रोटोकॉल बाजूला ठेवून लहान-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे आणि राजकीय नेत्यांच्या घरी भेटी देण्याचा धडाका लावला. एवढेच नव्हे तर जाहीर भाषणांतून त्यांच्या समर्थकांनी केलेली सूचक वक्तव्ये आणि त्यावर शिवराज पाटलांनी केलेल्या टिप्पण्या पाहता त्यांचा लातूरच्या राजकारणात इंटरेस्ट वाढला असल्याचे दिसून आले.
लातूर जिल्ह्यातील राजकारण हा नेहमीच राज्यपातळीवर चर्चेचा विषय राहिला आहे. शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख या तीन दिग्गज नेत्यांमुळे लातूरच्या काँग्रेसमध्ये साहजिकच तीन गट पडले. कायम सोबत असल्याचे चित्र उभे करतानाच या तिन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पाडापाडीचे राजकारणही केले. त्यातील विलासराव देशमुख हे सगळ्यात प्रभावी नेते होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर लातूरमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्यातच शिवराज पाटील सक्रिय राजकारणातून बाजूला पडले आहेत. पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्त असलेल्या पाटील यांना सक्रिय राजकारणात हस्तक्षेप करण्यात मर्यादा येत होत्या. प्रोटोकॉलमुळे तेही फारसे स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करीत नाहीत. मात्र, विलासरावांच्या निधनानंतर पहिल्यांदाच लातूरला आलेल्या चाकूरकरांनी ‘प्रोटोकॉल’ थोडासा बाजूला ठेवत स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. एरवी कौटुंबिक कार्यक्रमासाठी एक-दोन दिवस लातूर दौ-यावर येणारे शिवराज पाटील
गेल्या आठवड्यात लातूरला आले ते तब्बल दहा दिवसांसाठी.

‘गॉडफादर’ची प्रतिमा!
शिवराज पाटील यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील यांना लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी देण्याची चर्चा गेल्या वेळीही झाली होती. मात्र, ही जागा अमित देशमुखांना मिळाली. अर्चना पाटील यांना पुन्हा एकदा लातूर शहरामधून तिकीट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐनवेळी आपले समर्थक प्रदीप राठी यांनाही उमेदवारी देण्याची मागणी करून लातूर शहरावर आपले वर्चस्व टिकवण्यासाठी चाकूरकर प्रयत्न करू शकतात. त्याचबरोबर विलासराव देशमुखांच्या पश्चात आता आपणच या जिल्ह्याचे गॉडफादर नेते आहोत ही प्रतिमाही त्यांना निर्माण करायची असावी. तसेच जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठीचे सगळे फॅक्टर त्यांनी या दौ-यात अमलात आणले आहेत.
राठींना बळ देण्याची तयारी
शिवराज पाटील असल्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत असा आजवरचा इतिहास आहे. या कार्यक्रमांतून त्यांनी देशमुख गटाला सूचक इशारा दिला. कव्हेकरांनीही चाकूरकर आपले गॉडफादर असल्याची प्रतिमा निर्माण केली.
या कार्यक्रमात एका वक्त्याने प्रदीप राठी राजकारणातून बाहेर पडल्याचे सांगितले. त्यावर टिप्पणी करताना शिवराज पाटील यांनी राठी हे लातूरच्या राजकारणात पूर्वीही सक्रिय होते आणि आताही सक्रियच असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर ते विलासरावांचे मित्र होते अशी कोपरखळी मारली. मामुली (मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत) मतांच्या आधारे राठींची लातूर शहराचा आमदार होण्याची इच्छा आहे. याच मतांनी 1995 मध्ये विलासरावांचा पराभव झाला होता. चाकूरकर खासदार, मंत्री असताना कधीच स्थानिक प्रश्नांत लक्ष घालत नव्हते. त्यांना यासंबंधी प्रश्न विचारला तरी ते चिडायचे. खासदार संसदेत कायदे बनवण्याचे काम करतात, असे त्यांचे उत्तर असायचे. या वेळी त्यांनी मनपाच्या नगरसेवकांशी स्वत: होऊन चर्चा केली.
कोठे उपस्थित राहिले
विलासराव देशमुखांचा 1995 मध्ये पराभव करणा-या आणि पुन्हा आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या रेणापुरातील महाविद्यालयात व्यापारी संकुलाच्या पायाभरणी कार्यक्रमास उपस्थिती.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि विलासराव देशमुख यांच्या विरोधात कधीकाळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या प्रदीप राठी यांच्या बँकेच्या शाखांचे उद्घाटन.
* दयानंद महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानाला उपस्थिती.
महापालिकेच्या पदाधिका-यांशी चर्चा आणि नगरसेवकांना मार्गदर्शन
चाकूरकरांच्या भेटीगाठी
*उदगीरचे नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या घरी भेट. निटुरे पूर्वी चाकूरकरांच्या गटात होते.
*लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोईज शेख यांच्या निवासस्थानी भेट.
*उदगीरमध्ये गेल्यानंतर शिवराज पाटील यांनी दिवंगत माजी खासदार अरविंद कांबळे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
*लातूरमधील उद्योजक जकी खान कायमखानी यांनी दिवाळीत उभारलेल्या एम्बॅसी इंटरनॅशनल हॉटेलला चाकूरकरांनी भेट दिली.
*उस्मानाबादला कार्यक्रमासाठी जाताना त्यांनी मुरूड येथे थांबून ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाडे यांची भेट घेतली. औशाचे माजी आमदार मल्लीनाथ महाराज यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी चाकूरकरांनी भेट दिली.