आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तांबडेंच्या अटकेसाठी पथके रवाना; निलंबनाचाही प्रस्ताव; जिल्हा पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्याकडून वरिष्ठांना अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पेठबीड पोलिस ठाण्यातील पोलिस जमादार हमीद शेख इनामदार यांना बुधवारी तडकाफडकी निलंबित करतानाच लाच स्वीकारण्यास सांगून फरार झालेले पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी विशेष पोलिस महासंचालकांकडे पाठवला. दरम्यान, तांबडे यांच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

पेठबीडच्या सुभाष कॉलनीतील शिवराज गायकवाड यांच्या घरी 23 जून रोजी पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडेंसह जमादार हमीद शेख इनामदार हे दोघे गेले. त्यांनी शिवराज यांचे वडील महादेव गायकवाड यांना पोलिस ठाण्यात नेल्यामुळे शिवराज गायकवाड ठाण्यात गेले. तेव्हा भाऊ गणेश याच्याविरुद्ध पूर्वी दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई करावयाची आहे, असे सांगत वडिलांना सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी केली. शिवराज यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार नोंदवल्यानंतर उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी पडताळणी करून 24 जून रोजी सापळा रचला. पोलिस ठाण्यासमोरील हॉटेलमध्ये जमादार इनामदार यांच्या सांगण्यावरून टपरीचालक खंडू बापूराव मोरे यांनी गायकवाड यांच्याकडून 10 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.

दोघांना पोलिस कोठडी
पेठबीड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडे, हवालदार हमीद शेख (इनामदार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हवालदार हमीद व टपरीचालक खंडू मोरे या दोघांची रात्री बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली.

विभागीय चौकशीही होणार
दरम्यान, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी पेठबीड ठाण्याचा हवालदार हमीद याला तडकाफडकी निलंबित केले. पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडे यांच्या निलंबानाचा प्रस्ताव विशेष पोलिस निरीक्षक अमितेश कुमार यांना पाठवला आहे. दरम्यान, तांबडे यांची विभागीय चौकशी होणार आहे. पेठबीड ठाण्याचे पोलिस हवालदार शेख हमीद यांना लाच घेताना अटक करण्यात आली. गुन्ह्यात पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडे यांचा सहभाग असल्याने बुधवारी दिवसभर पोलिस खात्यात या प्रकरणाची चर्चा होती. या प्रकारामुळे पोलिस खात्याची इभ्रत वेशीला टांगली गेली आहे.

सोनवणेंंकडे पदभार
पेठबीड ठाण्याचे पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडे हे लाचखोरीमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने त्यांच्या जागी धुळ्याहून आलेले पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्याकडे पेठबीडचा पदभार देण्यात आला आहे. सुरुवातीला सोनवणे मंगळवारी पोलिस नियंत्रण कक्षात रुजू झाले. बुधवारी त्यांना पेठबीड ठाण्याचा पदभार देण्यात आला. बुधवारी दिवसभर या प्रकाराचीच चर्चा बीड शहरात सुरू होती.
दोघांना तीन दिवसांची कोठडी
मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी हवालदार हमीद व टपरीचालक मोरे या दोघांना विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश बनकर यांनी दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अटकेसाठी शोधाशोध
मुलावरील कारवाईसाठी वडिलांना ठाण्यात आणून मोबाइलवर 10 हजारांची मागणी करणारे पोलिस निरीक्षक चांगदेव तांबडे फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस प्रयत्न करत आहेत.