आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन म्हणते नियम माेडणार नाही, २० प्रस्ताव अडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असल्याने जनावरांच्या चारा-पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाच्या वतीने १३ ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून ११ हजार ७९६ जनावरांची सोय झाली आहे. परंतु, अद्याप जवळपास २० छावण्यांचे प्रस्ताव प्रशासन दरबारी असून त्यांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी, यासाठी पशुपालकांसह लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. दुसरीकडे नियमात नसणाऱ्या छावण्यांना मंजुरी नाहीच, असा ठाम निर्धार प्रशासनाने घेतल्याने दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांचे प्रस्ताव नियमांच्या कचाट्यात अडकले आहेत.

परंडा तालुक्यात मागील चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत असल्यामुळे प्रकल्प, विहिरी, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. पावसाअभावी हिरवा चारा तसेच कडबा नसल्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पशुपालक आपली दुभती गाय, म्हैस व इतर जनावरे बाजारात घेऊन जाऊ लागला होता. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे चारा छावणीसाठी शासनाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले. त्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले आहेत. परंतु, नियम डावलणाऱ्यांना मंजुरी मिळणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी यांनी घेतल्यामुळे लोकप्रतिनिधींसह चारा छावणीचालक हतबल झाले. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात अांदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. या अांदोलनात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. तालुक्यात लहान व मोठी जनावरांची संख्या ७४ हजार असून चारा उपलब्ध नसल्यामुळे उपासमार होऊ लागली होती.

शासनाकडे चारा छावणी सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यानुसार टप्प्या-टप्याने मंजुरी देण्यात आली. परंतु, शासकीय नियम व अटी आदींचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना दिल्याने तसेच तपासणीसाठी पथक नेमण्यात आल्याने त्रुटी असणाऱ्या चारा छावणी संस्थांना आर्थिक दंडही करण्यात आला. परंडा तालुक्यात अद्यापपर्यंत १३ ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात भोत्रा- ८९९ जनावरे, चिंचपूर(बु.)- ११४९, देवगाव(बु.)- ९७५, पांढरेवाडी- ७४५, वाटेफळ- ५०९, कौडगाव-१२४५, सोनारी ६१०, डोंजा ६७६, परंडा- ७९०, वाकडी- १०८१, आसू-ऐनापूरवाडी-८१९, लोणी-९८३ आणि जवळा(नि.)- १४१५ अशी एकूण लहान व मोठी ११ हजार ७९६ जनावरे छावण्यांत आहेत.

या अटींची व्हावी पूर्तता
तहसीलदार किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या नायब तहसीलदार यांच्या पत्राशिवाय छावणीत दाखल केलेल्या जनावरांच्या संख्येचे अनुदान कपात करून प्रतिजनावर मोठे ५ रुपये व लहान जनावर २.५० रुपये दंड अाकारला जाणार आहे. दैनंदिन चारा / आहार वाटप, आहार खरेदी, दाखल जनावरांच्या नोंदी दैनंदिन नोंदवह्या अद्ययावत न ठेवल्यास जनावरांच्या संख्येनुसार ५ रुपये दंड, जनावरांसाठी शेडची उभारणी व पुरेसा निवारा न करणे, जनावरांच्या ओळखीसाठी ॲनिमल इअर टॅगचा वापर न करणे.

चारा छावणीतील जनावरांना ओला चारा मोठे जनावरास- १५ किलो, लहान जनावर- ७.५० किलो, सुका चारा- ६ किलो, ३ किलो, एक दिवसआड पेंड-१ किलो, पशुखाद्य १ किलो, पाणी दररोज ६० लिटर व लहान जनावरास ३० लिटर, तसेच दुधाळ जनावरांसाठी ४०० ग्रॅम अतिरिक्त खाद्य देणे, चारा छावणीत वेळेत स्वच्छता न करणे, विद्युतपुरवठा नसणे, लसीकरण व आरोग्य सुविधा वेळेत न पुरवणे, जनावरांच्या संख्येचा दिलेला अहवाल तपासणीअंती फरक आढळून आल्यास प्रतिजनावर मोठे ५ रुपये व लहान जनावर-२.५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

परंड्यात १३ छावण्या सुरू
तालुक्यात १३ ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. तसेच आणखीन २० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. छावणी तपासणी पथक तयार करण्यात आलेले आहे. जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांना दंड आकारला जाणार आहे.
-स्वरूप कंकाळ, तहसीलदार.
बातम्या आणखी आहेत...