आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीची शिक्षा भोगण्यास स्वस्त धान्य दुकानदारांची तयारी, गरीब शेतकऱ्यांच्‍या योजनेत भ्रष्‍टाचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गरीब शेतकऱ्यांची योजना स्वत:च्या घशात घालणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेल्या चुकांची जबाबावर कबुली दिली आहे. विशेष म्हणजे झालेल्या चुकीबद्दल नियमानुसार शिक्षा भोगण्यास तयार असल्याचा खुलासा पुरवठा विभागाच्या तपास अधिकाऱ्यांकडे केला आहे. 
 
आता प्रशासन संबंधित दुकानदारांवर कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. ‘दिव्य मराठी’ने रविवारी (दि.२६) ‘गरीब शेतकऱ्यांची योजना रेशन दुकानदारांच्या घशात, कोट्यधीशांना गरीब दाखवून कोट्यवधींचे धान्य उचलले’ अशा आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तालुका पुरवठा विभागाने चौकशी केली असून प्राथमिक अहवाल शुक्रवारी (दि.३) जिल्हा पुरवठा विभागाला सादर करण्यात आला आहे.   
 
शासनाने गरीब शेतकऱ्यांसाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना सुरू केली आहे. मराठवाडा, विदर्भातील १४ जिल्ह्यांत ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना दोन रुपये प्रतिकिलाे गहू, तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ याप्रमाणे प्रतिमाणसी, प्रतिमहा पाच किलोप्रमाणे धान्य मिळते.
 
वास्तविक, ऑगस्ट २०१५ मध्ये योजना सुरू झाली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नाही. त्यामुळे बहुतांश रेशन दुकानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर आलेला माल काळ्या बाजारात विक्री केला आहे. शहरी भागात तर कोट्यधीश असलेल्या प्रतिष्ठित मंडळींना गरीब शेतकरी दाखवून दुकानदारांनी परस्पर माल हडप केला आहे. 

दोषींवर कारवाई होणार
वास्तविक, शहरी भागातील अनेक कुटुंब स्वस्त धान्य दुकानात कुठलाही माल खरेदी करण्यासाठी जातच नाहीत, तरीही अशा कुटुंबांना गरीब शेतकरी दाखवून प्रतिष्ठित मंडळींसह शासनाची दिशाभूल केली आहे. यासंदर्भात "दिव्य मराठी’ने संपूर्ण पुरावे तयार करून यासंदर्भात शेतकऱ्यांची तसेच शासनाची कशी फसवणूक केली जात आहे, हे विस्ताराने मांडले. "दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर जिल्हा पुरवठा विभाग खडबडून जागा झाला असून दोषींवर कारवाई होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...