आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट उत्तरपत्रिका लिहून गुण देणारे रॅकेट जालन्यात पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड/ जालना - इयत्ता बारावीच्या बनावट उत्तरपत्रिका आणून विद्यार्थ्यांमार्फत उत्तरे लिहून घेत पासची हमी देणाऱ्या रॅकेटचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला. अंबड रोडवरील मातोश्री लॉन्सशेजारील संस्कार निवासी वसतिगृहात शुक्रवारी सायंकाळी ७ ते ९ अशी दोन तास ही कारवाई करून पोलिसांनी मुख्य सूत्रधार श्रीमंत वाघ (मानेपुरी, ता. जालना) यास २५०० उत्तरपत्रिकांसह ताब्यात घेतले.

परभणी, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या मूळ व बनावट उत्तरपत्रिका तसेच बारकोड मिळून आले. वाघ याने पिशोर (╣ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील एका प्राध्यापकाकडून या उत्तरपत्रिका आणल्याची कबुली दिली असून औरंगाबाद पोलिस त्याला पकडण्यासाठी रवाना झालेत. वाघ पिशोरच्या प्राध्यापकाकडून मूळ उत्तरपत्रिका घेऊन येत असे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून घेई. त्यानंतर जवळच्या नातेवाईक किंवा संपर्कातील मुलांकडून बनावट उत्तरपत्रिका लिहून घेत असे. यासाठी मुलांना मोबदला म्हणून २५ रुपये प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी देत असे. मागील आठ दिवसांपासून पोलिस लक्ष ठेवून होते.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी जमादार कल्याण आटोळे, यशवंत मुंढे यांना वसतिगृहात पाठवून खात्री पटताच सहायक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर पठाडे, जमादार कृष्णा चव्हाण, विष्णू चव्हाण आदींनी छापा टाकला व श्रीमंत वाघ याच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यासमोर असलेल्या उत्तरपत्रिका जप्त केल्या.

प्राथमिक चौकशी केल्यावर वाघ यानेही बनावट उत्तरपत्रिका व स्टिकरचे गठ्ठे काढून दिले. या वेळी ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिल्या त्यांचे जबाब घेतले असता वाघ याच्या सांगण्यावरून केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, पाली, इंग्रजी आदी विषयांच्या उत्तरपत्रिका लिहीत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या वेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.
जालन्याची लिंक
मे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, स्टेशन रोड, औरंगाबाद पिन.को. ४३१००५, साइज १५ बाय १० असा शिक्का असलेल्या उत्तरपत्रिकांच्या पिशव्या, नमुना उत्तरपत्रिका झेरॉक्स, गाइड्स तसेच वाटूर (ता.मंठा, जि.जालना) येथील एका महाविद्यालयाच्या लेटरहेडवर भोकरदनच्या महाविद्यालयाच्या नावे लिहिलेले पत्रही मिळाले.
बातम्या आणखी आहेत...