आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना : बनावट उत्तरपत्रिका लिहिणारे २ अटकेत, तिघांचा शोध सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - इयत्ता बारावीच्या बनावट उत्तरपत्रिका लिहून गुणांकन देणाऱ्या रॅकेटमधील दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागीय मंडळाचे (बोर्ड) अध्यक्ष डॉ. सुखदेव डेरे यांच्याकडून पोलिसांनी उत्तरपत्रिका तपासणीबाबत शनिवारी सकाळीच चौकशी केली. बोर्डाचे २ कर्मचारीही तपासकामी घेतले आहेत. फरार तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.
श्रीमंत अर्जुनराव वाघ (३२, मानेपुरी, ता. घनसावंगी, ह. मु. संस्कार निवासी वसतिगृह, मातोश्री लॉन्सशेजारी, यशोदीपनगर, जालना) व ए. टी. पालवे (अंबड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील वाघ यास शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता वसतिगृहात सहायक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी अटक केली होती, तर पालवे याला अंबड तालुक्यातील शेवगा येथून रविवारी पहाटे ४ वाजता अटक केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नाेंदवला असून तपास पोलिस निरीक्षक भागीरथ देशमुख करीत आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यात परजिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. त्यांना अटक करून तपास करण्यासाठी पाेलिस कोठडी द्यावी, अशी विनंती पोलिस निरीक्षक देशमुख यांनी केली. या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
दोषी मुख्याध्यापकांचे निलंबन
यात मंडळाचा सहभाग अजिबात नसावा. मंडळाकडून संबंधित केंद्राच्या मुख्याध्यापकांना फक्त कोऱ्या उत्तरपत्रिका दिल्या जातात. त्याचा वापर परीक्षा केंद्रांवर होतो. यामुळे उत्तरपत्रिका मुख्याध्यापकाच्या ताब्यात आहेत. मात्र, कोणत्या मुख्याध्यापकांकडून या उत्तरपत्रिका अनधिकृत व्यक्तीकडे दिल्या याचा पोलिसांकडून तपास पूर्ण झाल्यावर दोषी मुख्याध्यापकांचे निलंबन करू. परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिका परिरक्षकाकडे पाठवल्या जातात. या ठिकाणी बारकोड आणि यूआयडी क्रमांक चिकटवतात, जेणेकरून विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक कुणाला माहिती होत नाही. त्यानंतर परिरक्षकाकडून त्या-त्या शाळा/महाविद्यालयांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठवल्या जातात. या ठिकाणच्या शिक्षक/प्राध्यापकांनी शाळा/महाविद्यालयातच उत्तरपत्रिका तपासाव्यात हा सक्त नियम आहे. यामुळे शाळा/महाविद्यालयाबाहेर उत्तरपत्रिका नेऊन तपासता येत नाहीत. मात्र, ज्या मुख्याध्यापकांनी बाहेरून उत्तरपत्रिका तपासून घेतल्या त्यांच्यावर कठोर कारवाई करू. प्रसंगी शाळा/महाविद्यालयाच्या मान्यता काढून घेऊ, असे माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागीय मंडळाचे (बोर्ड) अध्यक्ष डॉ. डेरे म्हणाले.
अशी कार्यपद्धती, तरीही गैरप्रकार
एका दिवसात पेपरच्या वेळेनुसार (३ तास, अडीच तास, २ तासांचा पेपरचा वेळ) २५ ते ४५ पेपर तपासता येतात. तरीसुद्धा अडीच हजार पेपर जालन्यात एका खासगी व्यक्तीकडे आले. दरम्यान, पिशोर येथील योगिराज दयानंद महाराज ज्युनियर कॉलेज (पिशोर, ता. कन्नड) चा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एस. सोनवणे हा परिरक्षक आहे. त्याने मंडळाचा विश्वासघात करून उत्तरपत्रिका जालन्यात श्रीमंत वाघ याच्याकडे पाठवल्या, तर ए. टी. पालवे, शंकर तिकांडे (शेवगा, ता. अंबड) व पाटील (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी ते कायदेशीर तपासनीस नसतानासुद्धा तपासून दिल्या. यातील एक प्राध्यापक रात्रीतून फरार झाला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान नाही
प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मंडळ घेईल. यासाठी नियोजित वेळेवरच निकाल घोषित करू. मात्र, ज्यांनी चुका केल्या त्या मुख्याध्यापक, नियामक, परिरक्षक यांच्यावर कारवाई होईलच, असा दावा डॉ. डेरे यांनी केला आहे. पोलिस यंत्रणा कसून तपास करत असून संपूर्ण रॅकेटपर्यंत पोहोचून दोषींवर कारवाई करू, असे पोलिस अधीक्षक सिंह म्हणाल्या.
दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदवू
औरंगाबाद - बारावीच्या बनावट उत्तरपत्रिका आणून विद्यार्थ्यांमार्फत उत्तरे लिहून घेत पासची हमी देणाऱ्या जालन्यातील रॅकेट प्रकरणात परिरक्षक, मॉडरेटर व प्राचार्य जबाबदार असून तपासणीत दोषी आढळून आल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंदवण्यात येतील, अशी माहिती बोर्डाचे विभागीय अध्यक्ष डेरे यांनी दिली. सापडलेल्या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांत मूळ उत्तरपत्रिकेचे पहिले पान बदलून त्याची शिलाई उसवण्यात आली. लिहिणे झाल्यावर पान पुन्हा बदलून शिवण्यात आल्याचा प्रकारही उघड झाला.