आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीमुळे दहा गावांतील पशुधनाला मिळाला आधार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- ग्रामसेवक संघटनेने सुरू केलेल्या चारा छावणीत खुलताबादसह दहा गावांतील पशुधनास आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे शासनाचे कुठलेही अनुदान न घेता सुरू केलेल्या या छावणीत पशुधनाची चार्‍या-पाण्याची काळजी घेतली जात आहे. यामुळे टंचाईग्रस्त खुलताबाद तालुक्यातील शेतकर्‍यांनाही दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाने खुलताबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केलेला नसला तरी या तालुक्यातील जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होता. खुलताबाद शहर व आसपासच्या परिसरात एकही चारा छावणी नसल्याने येथील शेतकर्‍यांचे जनावरांच्या चारा-पाण्यासाठी हाल होत होते.
ही अडचण लक्षात घेऊन ग्रामसवेक संघटनेच्या वतीने 14 मे रोजी खुलताबाद येथे मोफत चारा छावणीस प्रारंभ करण्यात आला. यामुळे खुलताबाद शहर, सराई, सालुखेडा, खिर्डी, सोनखेडा, गदाणा, भांडेगाव, विरमगाव आदी गावांमधील पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न निकाली निघाला.
छावणीतील पशुधनासाठी औरंगाबादसह नाशिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ऊस, ज्वारीचा कडबा पुरवण्यात येत आहे. प्रत्येक जनावरास दिवसातून तीन वेळेस योग्य तो आहार देण्यात येतो. उसाची व चार्‍याची कुट्टीही देण्यात येते. यासाठी संघटनेतर्फे कुट्टी करण्याचे मशीनही घेण्यात आले आहे. चार्‍याबरोबरच पाण्यासाठी मोठा हौद बांधण्यात आला आहे. टँकरचे पाणी हौदात सोडण्यात येते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. सोनवणे, जिल्हा सचिव टाकळकर, तालुका संघटनेचे अध्यक्ष आर. डी. चौधरी हे जातीने लक्ष देऊन छावणीचे नियोजन करत आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मालोदे, आमदार प्रशांत बंब, तहसीलदार अनिता
भालेराव आदींनी छावणीस भेटी देऊन समाधान व्यक्त केले.

दमदार पाऊस पडेपर्यंत ही छावणी सुरू ठेवणार आहे. 14 मेपासून छावणी सुरू करण्यात आली. तेव्हापासून जनावरांसाठी चार्‍या-पाण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या कुठल्याही अनुदानाशिवायही सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ही छावणी सुरू करण्यात आली आहे.
-एल. जी. गायकवाड, राज्य अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

आरोग्याची देखभाल
पशुधनाच्या देखभालीसाठी 8 ते 9 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 मे रोजी छावणीत रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये पुशवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत सर्व जनावरांची तपासणी करण्यात आली. लसीकरण करून शेतकर्‍यांनाही जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.