आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूरमधील बालकामगारांकडून हाडांची भुकटी, कारखान्यावर छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील हाडाची भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा मारला. या वेळी बालकामगारांकडून हाडाची भुकटी तयार करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, जीवघेणा दर्प कारखान्याच्या परिसरात तीन ते चार किलोमीटरपर्यंत येत असल्यामुळे कारखाना बंद करण्यासाठी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून लढा देत आहेत.

इटकळ गावापासून सुमारे दीड किलोमीटरवर हा कारखाना गेल्या आठ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. येथे सुरुवातीला काही दिवस अत्यंत कमी स्वरूपात कारखान्याची भुकटी करण्यात येत होती. यामुळे याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथे मोठ्या प्रमाणात हाडांची भुकटी करण्याचे काम करण्यात येत होते. बालकामगारांच्या माध्यमातून येथे हाडाची भुकटी तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या मार्गदर्शनात इटकळ दूरक्षेत्र पोलिस चौकीतील हवालदार आर. जी. सातपुते, एन. एच. वाघमोडे, डी. एच. ससाणे, एम. बी. पवार आदींनी येथे छापा मारला. तेव्हा मिळालेली माहिती खरी असल्याचे आढळून आले. तेथून परप्रांतातील सहा तर स्थानिकच्या एका बालकामगाराला पोलिसांनी अटक केली. पोलिस मित्र विष्णू बंडगर, राजकुमार गायकवाड यांच्या मदतीने यासंदर्भात कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या वेळी पोलिसांनी तीन टेम्पो (एमएच २५, ८३०५, एमएच १३, आर ४८०६, एकाचा वाहनाचा क्रमांक नमूद नाही) जप्त केले आहेत.
दरम्यान, हा कारखाना बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मात्र, केवळ अदखलपात्र कारवाई करण्यात येते. यामुळे काही दिवस कारखाना बंद राहतो. नंतर मात्र काही दिवसांनी पुन्हा कारखाना सुरू करण्यात येतो. उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी शिवारात असेच कारखाने सुरू होते. परिसरातील चार गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन कारखान्यांच्या विरोधात लढा दिला होता. यामुळे हे कारखाने आता बंद करण्यात आले आहेत.

प्रदूषणाचे नियम बसवले धाब्यावर
गावाच्या गट नंबर २६८ मध्ये सैफन कुरेशी ( रा. सोलापूर) यांचा हा कारखाना आहे. या कारखान्याची कोणतीही नियमानुसार कागदपत्रे नसल्याचे समजते. तसेच प्रदूषण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा कारखाना चालवला जात आहे. याकडे महसूल व अन्य यंत्रणांचे मोठे दुर्लक्ष आहे. हा कारखाना तातडीने बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

रात्री होते काम
दिवसा येथे काम बंद असते. रात्रीच्या वेळी मात्र माेठ्या प्रमाणात हाडांची भुकटी तयार करण्याचे काम करण्यात येत असते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रोज चार ट्रक व मोठे टेम्पो भरून हाडे येथे आणली जातात. काही हाडे ओली असतात. यामुळे उघड्यावरच ही सुकवण्याची कामे केली जातात. यामुळे दर्प अधिकच जाणवत असतो.
कारखान्यात उघड्यावरच हाडे टाकण्यात येत असतात. यामुळे सुमारे ६० ते ७० कुत्रे येथे असतात. ही हाडे घेऊन कुत्रे परिसरात शेतात टाकतात. यामुळे परिसरातील सुमारे ३० ते ३५ एकर शेतीमध्ये हाडेच हाडे पसरलेली दिसून येत आहेत. यामुळे शेती करण्यास अडचणी येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...