आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाने रोखला बालविवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - वधू बेपत्ता झाल्याने घराची इभ्रत वाचवण्यासाठी वधूपित्याने त्याच वराशी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याबाबत माहिती मिळताच हा विवाह रोखण्यात महसूल विभाग व पोलिस प्रशासनास यश आले. तालुक्यातील पिरोळा येथील युवतीचा विवाह कन्नड तालुक्यातील दिगावखेडीच्या युवकाशी शुक्रवारी दुपारी होणार होता.

परंतु वधू गुरुवारी बेपत्ता झाल्याने पित्यासमोर संकट उभे राहिले. घराची इभ्रत वाचवण्यासाठी वधूच्या अल्पवयीन बहिणीसोबत विवाह करण्याचा मार्ग काढण्यात आला. हा प्रस्ताव दोन्हीकडच्या मंडळींना मान्य झाला.

मुलीला तयार करण्यात आले; परंतु ही बातमी तहसीलदार राहुल गायकवाड व ग्रामीण ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना समजली. दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी पिरोळा गाठले. शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री केली. ग्रामस्थ व मुलीच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन अल्पवयीन मुलीचे लग्न करण्यापासून परावृत्त केले. एव्हाना वरपक्षास ही माहिती मिळाल्याने ते आलेच नाहीत. दरम्यान, तालुक्यातील दुसरा बालविवाह रोखण्यात आम्हास यश आले आहे. शिक्षणाच्या अभावामुळे या गोष्टी घडत असल्याने कायदा व मुलींच्या भवितव्याबाबत समजावून सांगितल्यानंतर विवाह रोखण्यात यश आले, असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले.

ग्रामस्थांना दिली कायद्याची माहिती
कायद्याचा बडगा उगारण्यापेक्षा संवादातून अनेक प्रश्न सुटतात. बालविवाह रोखल्यानंतर बालविवाहविषयक कायदा गावकर्‍यांना समजावून सांगितला. त्यांच्या मोठ्या मुलीचा शोध घेऊन पित्याच्या स्वाधीन करू. - मिलिंद खोपडे, सहायक पोलिस निरीक्षक