आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन बायका तमाशा एेका: दुसऱ्या बायकोच्या सांगण्यावरून तिसऱ्या बायकोला फेकले कालव्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडीगोद्री- गुटखा खाण्याचे निमित्त करून त्याने पुलावर दुचाकी थांबवली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत गुटख्याच्या पुडीतून आणलेली मिरची पावडर त्याने पत्नीच्या डोळ्यात फेकली व तिला पुलावरून डाव्या कालव्यात फेकून दिले. अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे गुरुवारी रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित महिला कडाक्याच्या थंडीत कसेबसे पोहत कालव्यातून बाहेर आली. त्यानंतर तिने पोलिसांना हा प्रकार सांगितल्यावर पतीविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन बायका असलेल्या या लखोबाने दुसऱ्या बायकोच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 


सविता भाऊसाहेब महापुरे (३०, मुधलापुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद) असे या घटनेतून बचावलेल्या तक्रारदार महिलेचे नाव आहे. जवळच्या नातेवाइकाचा अपघात झाला असे सांगून पती भाऊसाहेब लक्ष्मण महापुरे हा गुरुवारी रात्री तिला घेऊन बाहेर पडला. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे पोहोचले. तेव्हा एका गुटखा खाण्याचे निमित्त करून त्याने एका पुलावर दुचाकी थांबवली. त्यानंतर तो लघुशंकेला गेला व अंधाराचा फायदा घेत सविताच्या डोळ्यात त्याने मिरचीपुड टाकली. अचानक काय झाले हे सुरुवातीला तिच्या लक्षात अाले नाही. तोपर्यंत त्याने मला उचलून पुलावरून कालव्यात टाकून दिले. 


पोहता येत नसल्याने मी पाण्यात बुडायला लागले, मात्र प्रयत्न करून एका शेतपंपाच्या पाइपला पकडून पाण्यातून बाहेर अाल्याचे सविताने पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे. यानंतर तिने जवळच असलेली एक वस्ती गाठली. तिथे रात्र काढल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने गोंदी पोलिस ठाण्यात जाऊन ही आपबीती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी पती भाऊसाहेब महापुरे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय विकास कोकाटे हे करीत आहेत. 


आरोपी होता सालगडी  
आरोपी भाऊसाहेब महापुरे हा पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करीत हाेता. दोन वर्षांपूर्वी सवितासोबत त्याने तिसरे लग्न केले होते. त्याच्या मनात असे काही असेल याची कल्पनाही आली नाही. त्यामुळेच स्वयंपाक करण्याचे सोडून मी दुचाकीवर बसले. तो जिवे मारण्याचा प्रयत्न करीन असे वाटले नव्हते, असे सविताने सांगितले. 

 

‘लखोबा’ने असा केला बनाव
पत्नी सविता घरी स्वयंपाक करीत असताना घरातील पीठ संपले म्हणून तिने पतीला दळण आणण्यासाठी गिरणीत पाठवले. तो सायकलवर गेला व येताना मित्राची दुचाकी घेऊन आला. पतीने महाकाळा येथील पाहुण्याचा अपघात झाला असून तातडीने जावे लागेल असे म्हणून पत्नीला दुचाकीवर बसवले. त्यानंतर चुर्मापुरी येथे आल्यावर तिला कालव्यात फेकून दिले. 


दुसऱ्या पत्नीच्या सांगण्यावरून केला प्रकार 
या प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब यास तीन पत्नी आहेत. पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने दुसरी बायको केली, तर दुसरी सोडून गेल्यावर सविता सोबत तिसरे लग्न केले. मात्र दुसरी बायको पुन्हा नांदायला आल्याने तिने सविताला घरात ठेवायचे नाही असे सांगितले व तिच्या सांगण्यावरूनच हा प्रकार केल्याचे सविताने पोलिसांना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...