आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवना ग्रामपंचायत सदस्यांत तुंबळ हाणामारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - विषयपत्रिकेत ऐनवेळी काही विषयांचा समावेश केल्याने शिवना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परांविरुद्ध तक्रार दिल्यामुळे अजिंठा पोलिसांत सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पंचायतीच्या मासिक सभेमध्ये सतत होणार्‍या वादामुळे गावातील विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

शनिवार, 28 रोजी शिवना ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे ही मासिक सभा गोंधळामुळे गाजली व विना ठरावाने उरकण्यात आली. मागील मासिक सभा 31 मे रोजी झाली होती. त्यात सर्वानुमते 14 विविध विषयांवर ठराव संमत करण्यात आले होते. मात्र, सत्ताधार्‍यांनी सदस्यांत कोणतीही चर्चा न करता परस्पर 8 ठराव घुसडले व त्याचे बजेटही वाढवून घेतले. ही बाब ग्रामपंचायत सदस्य गजानन राऊत यांना प्रोसिडिंगवरून लक्षात आली.

याबाबत राऊत यांनी प्रभारी ग्रामसेवक वाघ यांना जाब विचारला असताना ग्रामपंचायत सदस्य सखाराम धनवई यांनी अटकाव करून या ठरावास मान्यता देण्यास सूचवले. या वेळी दोन्ही सदस्यांत शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. यानंतर दोन्ही सदस्यांनी परस्परांविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गोंधळाला ग्रामस्थ कंटाळले
शिवना येथे होणार्‍या मासिक सभा प्रत्येक वेळी सदस्यांच्या आपसातील मतभेदामुळे वादात सापडल्याचे दिसून येत आहे. बहुतांश वेळा सभा विनाठराव गोंधळामुळे बरखास्त करण्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. विकासात्मक मुद्द्यांना दूर सारून केवळ या ना त्या कारणावरून गोंधळ घालून सभा बरखास्त होण्याची ही बाब काही नवीन राहिलेली नाही. त्यामुळे ग्रामसभेत सामान्य नागरिक येणे टाळत आहेत. ग्रामपंचायतीकडे कसलेच नियोजन राहिले नसून अशिक्षित सदस्यांमुळे गावाच्या विकासात मोठे अडसर निर्माण होत आहेत. - भगवान राऊत, ग्रामस्थ

ठरावाबाबत माहिती नाही
ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. बीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील मासिक सभा झाली होती. त्यानंतर मी या ठिकाणी प्रभारी ग्रामसेवक म्हणून रुजू झालो आहे. प्रोसिडिंगवरील अक्षर माझे नसून याबाबत मला काहीही माहीत नाही. राजेश वाघ, प्रभारी ग्रामसेवक.