आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लीनरचा रुग्णालयाच्या शौचालयात मृत्यू, औंढा नागनाथ येथील प्रकार उघडकीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- हैदराबाद येथे शेळ्या घेऊन जाणा-या अपघातग्रस्त टेम्पो क्लीनरला औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते; परंतु रुग्णालयाच्या शौचालयात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह तीन दिवसांनंतर आढळून आला. त्याचा खून झाला की रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे त्याला जिवाला मुकावे लागले याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.
धुळे, मालेगाव येथील २७ वर्षीय अकबरशहा सलीमशहा (व्यवसाय- क्लीनर) हा टेम्पोमध्ये (एमएच- ०५ एस-७३८) मध्ये औरंगाबादहून हैदराबादकडे शेळ्या घेऊन जात होता. औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाट्याजवळ २३ जानेवारीला सकाळी ८ वाजता सदर टेम्पो अपघातग्रस्त झाला. त्यामध्ये जखमी झालेल्या अकबरशहा व युनूस शेख अब्दुल हमीद यांना सोबतच्या सहकाऱ्यांनी औंढा नागनाथ रुग्णालयात दाखल केले आणि टेम्पो समोर निघून गेला. २६ जानेवारीला झेंडावंदन झाल्यावर रुग्णालयात घाण वास येत असल्याने सकाळी ११ वाजता सेवकांनी अधिक तपासणी केली असता त्यांना रुग्णालयाच्या शौचालयातून वास येत असल्याचे जाणवले. बाहेरून कडी लावलेल्या शौचालयाचे दार तोडून मध्ये पाहिले असता सडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसून आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास सुरू झाला आणि मृतदेह रुग्णालयात दाखल झालेल्या अकबरशहा याचा असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांनी मंगळवारी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर इनकॅमेरा विच्छेदन करण्यासाठी मृतदेह नांदेड येथील गुरू गोविंदसिंग रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेह डोक्यावर पडलेल्या स्थितीत आढळून आला आहे. त्यामुळे शौचालयात गेल्यावर तोच डोक्यावर पडला की त्याला शौचालयात फेकण्यात आले, याचा
तपास सुरू आहे.

रुग्णालयाचा निष्काळजीपणा की खून?
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची वैद्यकीय अधिकारी रोज सकाळ-संध्याकाळ तपासणी करीत असतात. शिवाय परिचारिकासुद्धा वाॅर्डातील रुग्णांवर लक्ष ठेवून असतात. मृत अकबरशहा बेडवर आहे की नाही, नसेल तर त्याला सुटी दिली का, याची माहिती कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किंवा परिचारिकांनी घेणे गरजेचे आहे. रुग्णालयातील शौचालयाचा दरवाजा बाहेरून कोणी लावला, तीन दिवस हे शौचालय किमान स्वच्छतेसाठी तरी का नाही उघडले हा प्रश्न रुग्णालय प्रशासनावर उपस्थित होत आहे. शिवाय अकबरशहा सोबत असलेल्याने त्याची काळजी का घेतली नाही, हा प्रश्नही आहेच.
तपासात सत्यता उघड होईल
"प्रकरणात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खुनाची शक्यताही पडताळली जात आहे. त्याचा सहकारी युनूस शेख याची चौकशी चालू असून रुग्णालय कर्मचाऱ्यांचे जबाबही घेण्यात येत आहेत. त्यामुळे सध्यातरी या प्रकरणावर ठोस भाष्य करता येणार नाही.'
एल. डी. केंद्रे, पोलिस निरीक्षक, औंढा नागनाथ.