आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर मंदिर स्वच्छतेच्या कामात पुजा-यांसह भाविकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या लौकिकात वाढ होण्यासाठी भाविकांना सेवा- सुविधा पुरविण्यासोबतच मंदिराचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राखणे गरजेचे आहे. देवीची सेवा म्हणून स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकानेच उचलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी शनिवारी (दि. 5) तुळजाभवानी मंदिराचा परिसर धुऊन स्वच्छ केला. त्यांच्यासोबत पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, संभाजी भोसले, नगरसेवक नागनाथ भांजी, सुधीर कदम, शिवाजी पाटील, अशोक शामराज, अरविंद अपसिंगेकर आदी 60 ते 70 पुजा-यांसोबतच मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार सुजित नरहरे, दिलीप नाइकवाडी, जयसिंग पाटील यांच्यासह कर्मचारी स्वच्छतेच्या कामात सहभागी झाले होते.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी महाद्वारजवळील भक्तनिवासात पुजारीवर्गाशी चर्चा केली. यावेळी मंदिर संस्थानचा नावलौकिक वाढविण्यासंदर्भात पुजा-यांकडून सूचना मागविल्या. यावेळी प्रा. संभाजी भोसले, नगरसेवक नागनाथ भांजी आदी पुजा-यांनी काही सूचना मांडल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी तुळजाभवानी मंदिराची परिक्रमा केली. टोळोबा मंदिरापासून परिक्रमेला सुरुवात करण्यात आली. दर्शन मंडपाच्या पायथामार्गे आराधवाडी, आराधवाडीतून भारतीबुवा मठ मार्गापासून भीमनगरात प्रवेश केला. मातंगी मंदिरातून राजमाता जिजाऊ महाद्वाराजवळ परिक्रमेची सांगता झाली. राजे शहाजी महाद्वारपासून मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. दोन्ही महाद्वार, कल्लोळ, गोमुख परिसर स्वच्छ केल्यानंतर निंबाळकर प्रवेशद्वारासह मंदिरात सर्वत्र स्वच्छता करण्यात आली.

नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी पुजा-यांनी सुचवले बदल
यावेळी भाविकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी पुजा-यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी पुजारी वर्गाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आगामी नवरात्रोत्सवातील कार्यक्रमाची रुपरेषा समोर मांडली. तसेच नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाविषयी पुजा-यांनी काही बदल सुचविले आहेत.