आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरजवळील पेठ येथे साकारणार वनौषधी उद्यान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- जिल्ह्यात वन विकासाकडे जिल्हा प्रशासन व वन विभागाने विशेष लक्ष पुरवले असून नागरिकांना वन व वन्यजीवांसंबंधी जवळीक वाटावी व त्यातून जैवविविधतेचे रक्षण व्हावे या हेतूने उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहरानजीक पेठ येथील वनक्षेत्रात वनौषधी उद्यान साकारण्यात येणार आहे.

निसर्ग व माणसात जवळीक साधली तर निसर्गाबद्दल माणसाची रुची वाढेल या हेतूने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी वनविस्तारावर भर दिला आहे. महसूल विभागाकडे असलेल्या जमिनीचे हस्तांतरण वन विभागाकडे न झाल्याने जिल्ह्यातील वन विस्ताराला ब्रेक लागले होते. तथापि, हस्तांतरणाचा सोपस्कार पोले यांनी पूर्ण केला व पाॅइंट ५४ टक्के असलेले जिल्ह्याचे वनक्षेत्र एक टक्क्यावर आले. गाड्या-बंगल्यांच्या जंजाळात हरवलेल्या नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ तरी घालता यावा, फुले-पाखरे, प्राणी, वनस्पती त्यांना प्रत्यक्ष पाहता यावेत, या माध्यमातून लहान मुलांत वन अन‌् वन्यजीवांबद्दलचे प्रेम वृद्धिंगत व्हावे या जाणिवेतून साखरा येथे वन उद्यान विकसित करण्यात आले आहे. फुले, वनस्पती अन गवताच्या सान्निध्यात स्वच्छंदपणे बागडणारे वन्यजीव, शुद्ध हवा, गोंगाटाचा अभाव, वन अन वन्यजिवांबद्दल माहितीचे दालन, छोट्यांसाठी खेळणी यामुळे लहान-थोरांसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. असेच रुपडे आता पेठ येथेही साकारणार आहे. येथे विकसित करण्यात येणाऱ्या वनौषधी उद्यानात एक एकरात रुद्राक्ष, चंदन, रक्तचंदन, पुत्रजीवा, सीताअशोक, काळा निंब, बेल, अर्जुन, बहावा, हिरडा, निर्गुडी, बेहडा, रिठा, जांभूळ अशा विविध २२ वनौषधींची लागवड करण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक जी. एस. साबळे यांनी सांगितले. याशिवाय निसर्ग माहिती केंद्रही येथे उभारण्यात येईल. त्यात जिल्ह्यातील वन व वन्यजिवांबद्दलची माहिती पोस्टरच्या रूपात पाहावयास मिळेल. येथे एक एकरात काटेरी वनही विकसित करण्यात येईल. यामुळे या वनाची माहिती, जैवविविधतेतील त्याचे महत्त्व प्रत्यक्षावलोकनातून नागरिकांना कळेल. वन विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून राज्य व राज्याबाहेरून वनोषधींची जातिवंत रोपेही आणली असल्याचे
साबळे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर भेटीवर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वनौषधीचे रोपटे लावून या नियोजित वनौषधी उद्यानाचे उदघाटन करण्यात आले. वनक्षेत्र वाढवणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांतून त्यास निश्चित हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

लातूरच्या सौंदर्यात भर
या नियोजित वन उद्यानामुळे लहान - थोरांचा निसर्गाच्या सान्निध्यात आपला काही अंशी तरी वेळ घालवता येईल. वन व वन्यजीवांबद्दल माहिती कळेल व हे उद्यान लातूरच्या सौंदर्यातही भर टाकेल.
-जी. एस. साबळे, सहायक वनसंरक्षक
बातम्या आणखी आहेत...