आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadanvis Kept Silence Over Dhanagar Reservation

धनगर समाजाच्या आरक्षणावर माळेगावात मुख्यमंत्र्यांचे मौन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - माळेगाव यात्रेसाठी साडेपाच कोटी रुपयांहून अधिक निधी देण्याची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांना सुखद धक्का दिला. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतीही ठोस घोषणा न केल्याने त्यांना उपस्थितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाषणानंतर मुख्यमंत्री व्यासपीठावरुन उतरताना उजव्या बाजूच्या जमावातून १०-१५ तरुणांनी काळे रुमाल, घोंगडी हवेत फिरवून निषेध नोंदविला.

धनगर समाज विकास परिषदेच्यावतीने माळेगावात जागर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले.त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. मेळाव्यात ते धनगर आरक्षणाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. आमदार अनिल गोटे, संयोजक गणेश हाके व प्रताप पाटील चिखलीकर यांनीही फडणवीस यांच्याकडे धनगर समाजाला आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली. परंतु आरक्षणात कोण कोणत्या अडचणी आल्या, या पूर्वीच्या सरकारने केंद्राला कसे चुकीचे अहवाल पाठविले याची माहिती देऊन आता टाटा सोशल सायन्सकडे अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले. अहवाल आल्यानंतर घटनेच्या चौकटीत आरक्षण देता येईल, कोणालाही न्यायालयात आव्हान देण्यास वाव उरणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु यामुळे उपस्थित जमावाचे समाधान होऊ शकले नाही. घोषणाबाजी सुरुच होती. परंतु थोडावेळ लागला तरी चालेल पण आरक्षण नक्की देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

मेळाव्याला भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसह एकही मंत्री उपस्थित नव्हता. भाजपाचे तुषार राठोड वगळता इतर आमदारही नव्हते. शिवसेनेचे खासदार बंडू जाधव, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष साबणे हे लोकप्रतिनिधी आवर्जून व्यासपीठावर होते.

खंडोबाला साकडे
आपण खंडोबाला साकडे घातल्याची माहिती फडणवीस यांनी भाषणात दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना जशी दुष्काळाशी सामना करून चांगले राज्य करण्याची शक्ती दिली तशी शक्ती आम्हाला दे. धनगर आरक्षणासाठीच्या प्रयत्नांना १०० % यश दे असे साकडे खंडोबाला घातल्याचे ते म्हणाले.
५.५ कोटींचा निधी
विलासरावांनी यात्रेला ५ कोटीचा निधी दिल्याचा उल्लेख आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला. त्यावर फडणवीस यांनी मी ५ कोटी, ५५ लाख, ५५ हजार ५५५ रुपयाचा निधी देतो. पर्यटन विकास महामंडळाच्या निधीतून देण्याचे जाहीर केले.

प. महाराष्ट्र टार्गेट
धनगर आरक्षणावर प. महाराष्ट्रातील नेत्यांवर फडणवीस यांनी टीका केली. आरक्षणामुळे आपले मतदारसंघ आरक्षित होतील या भीतीने काही नेत्यांनी त्यात अडथळे आणल्याचे ते म्हणाले.

५ किमी लांब रांगा
माळेगाव यात्रेत रविवारी अभूतपूर्व ट्रॅफिक जॅम झाली. मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने आल्याने त्यांची सोय झाली. परंतु यात्रेला आलेल्या लोकांच्या तसेच बाहेरगावच्या वाहनांच्या गर्दीमुळे पाच किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.

गर्दी, सभेसाठी आलेल्या नेत्यांच्या गाड्या, नांदेड-लातूर मार्गावर होणारी एस.टी. बस, खाजगी बस वाहतूक, उसाचे ट्रक, आॅटोरिक्षांची गर्दी मेळाव्यानंतर रस्त्यावर आली. त्यामुळे जवळपास ५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. खुद्द जिल्हा पोलिस अधिक्षक परमजितसिंह दहिया यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी ३ किलोमीटर पायपीट करावी लागली. अनेक आमदार, माजी आमदार, भाजप नेते वाहतुकीत दोन तास अडकून पडले.