परभणी- दुधगाव (ता. जिंतूर) येथे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या माध्यमातून चार बंधाऱ्यांच्या उभारणीचे काम जलयुक्त शिवारअंतर्गत प्रगतिपथावर आहे. दरम्यान, शनिवारी पडलेल्या अवघ्या २० मिनिटांच्या पावसानेच हे बंधारे तुडुंब भरले आहेत. जलयुक्तच्या कामाची ही यशस्विता ट्विटर व
फेसबुकवर पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेत समाधान व्यक्त केले आहे.
तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीने सिंचनाखालील शेती धोक्यात आली आहे. दुधगाव परिसरात ही परिस्थिती पावसाअभावी अधिकच बिकट झाल्याने दुधगाव येथील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित पारवे यांनी या गावातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे बंधारे निर्माण करण्यासाठी निधीची मागणी केली. जलयुक्त शिवार समितीचे अशासकीय सदस्य गजानन काकडे यांनी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे या कामाबाबत शिफारस केल्यानंतर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चार बंधाऱ्यांना ३१ मार्च रोजी मान्यता दिली. ५९ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या बंधाऱ्यांच्या कामांना तीन जून रोजी प्रारंभ झाला. यामध्ये पहिल्याच पावसात अर्धवट स्थितीतील या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. हे बंधारे दोन किलोमीटरपर्यंत करण्यात येत आहेत. एका बंधाऱ्याची लांबी ही ५०० मीटर ठरवण्यात आली आहे. बंधाऱ्यात साचलेल्या पाण्याचे फोटो फेसबुक व टि्वटरवर टाकण्यात आले. त्याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन राज्यात दुधगावचा हा प्रयोग यशस्वी झाल्याची नोंद केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक व ट्विटरवर हे फोटो टाकण्यात आले आहेत.