आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज माळेगावात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- माळेगावच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी येत आहेत. यात्रेला भेट देणारे ते पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या उपस्थितीत धनगर परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही परिषदही वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

स्व. विलासराव देशमुख यांचे खंडोबा कुलदैवत असल्याने ते नित्यनेमाने यात्रेला येत. त्यांचे वडील दगडोजीरावही न चुकता यात्रेला येत. विलासरावामुळे यात्रेत राजकीय पुढाऱ्यांचा राबता वाढला व यात्रेला धार्मिकतेसोबतच राजकीय स्वरूपही आले. मंत्रिपदावर असोत वा नसोत, त्यांची यात्रेची वारी कधी चुकली नाही. विलासरावांमुळेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे पाय माळेगावकडे वळले. देशमुख-चव्हाणांचे राजकीय वितुष्ट आल्यानंतर त्याचे पडसाद यात्रेतही उमटू लागले. त्यातच लोहा मतदारसंघातून विलासरावांचे कट्टर समर्थक प्रताप पाटील चिखलीकर निवडून आल्यानंतर व माळेगाव त्यांच्या मतदारसंघात येत असल्याने यात्रेत कुस्तीपेक्षा राजकीय आखाडेच जास्त गरम होऊ लागले.

आता तर सगळेच बदलले
आता विलासराव हयात नाहीत. अशोक चव्हाण सत्तेत नाहीत. राज्यात व केंद्रात काँग्रेसची सत्ता नाही. प्रताप पाटील चिखलीकर आमदार आहेत, परंतु शिवसेनेत आहेत. यात्रेचे नियोजन करणारी जिल्हा परिषद मात्र काँग्रेसच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्री भाजपचे आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यात्रेत येत आहेत.

विलासराव व अशोक चव्हाण या दोन जणांचा अपवाद वगळता कोणत्याही मुख्यमंत्र्याने यात्रेला कधी हजेरी लावली नाही. देवेंद्र फडणवीस मात्र प्रथमच बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री म्हणून हजेरी लावत आहेत.