आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंग्‍यात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले; म्हणाले, \'अाई काळजी करू नकाे मी सुखरूप!\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर/ मुंबई- निलंगा येथील शिवार संवाद कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर विजेच्या ओव्हरहेड तारांना पंख्याचे पाते धडकल्याने काही सेकंदातच खाली कोसळले. 
 
खराब हवामानामुळे पायलट हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करत असताना क्रॅश लँडिंग करावे लागले. या अपघातात मुख्यमंत्र्यांसह सहा जण थोडक्यात बचावले. मुंबईहून विशेष विमान मागवून मुख्यमंत्री लातूरमार्गे विमानाने मुंबईकडे रवाना झाले.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांचा बुधवारी रात्री निलंग्यात कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी मुक्काम होता. सकाळी त्यांनी हलगरा येथे जाऊन श्रमदान केले आणि शेतकरी शिवार संवाद अभियानाचा प्रारंभ केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणखी एका कामाला भेट देऊन निलंगा गाठले. तेथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर पोलिसांनी हेलिपॅड बनवले होते. त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी ‘सिकारस्की व्ही टी’ या बनावटीचे हेलिकॉप्टर तयार होते.  
 
मुख्यमंत्री ११.४५ मिनिटांनी हेलिकॉप्टरमध्ये बसले. दहा मिनिटांतच हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मुख्यमंत्र्यांभोवती कडे करून पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्या पथकाने त्यांच्या वाहनापर्यंत आणले आणि तातडीने त्यांना संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी नेले. यानंतर डॉक्टरांच्या एका पथकाने मुख्यमंत्र्यांसह सर्वांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांचा रक्तदाब सामान्य असल्याचे आढळून आले तसेच कुणालाही काहीही गंभीर दुखापत झाली नाही. केतन पाठक यांच्या डोक्याला मार लागला असून हाताला थोडे खरचटले अाहे.
 
मुंबईहून मागवले विमान : अपघातानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयात फोन करून एक विमान तातडीने लातूरला पाठवायला सांगितले. कारद्वारे लातूर आणि तेथून मुंबईहून आलेल्या विशेष विमानाने मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मुंबईकडे रवाना झाले.
 
पंतप्रधानांनी केली विचारपूस : पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, मंत्री, आमदार, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना फोन करून त्यांची विचारपूस केली.
 
हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड नव्हताच-  पायलट संजय कर्वे
राज्य सरकारच्या विमानचालन संचालनालयाचे संचालक व मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरचे पायलट संजय कर्वे यांनी सांगितले, ‘हेलिकाॅप्टरमध्ये अाधीच बिघाड असल्याच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. तसे असते तर जीव धाेक्यात घालून मी ते का चालवले असते. सिर्कोस्की हे हेलिकाॅप्टर  ५२ डिग्री तापमानाही व्यवस्थित चालू शकते. यामुळे तापमानामुळे त्यात काही बिघाड झाला असेल असे मला तरी  वाटत नाही. आता चौकशीतून खरे काय ते बाहेर येईलच. प्रचंड धुराळ्यामुळेही हेलिकॉप्टरची दिशा चुकली असेल, या चर्चेतही काही अर्थ नाही. सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत विमाने कशी चालवायची, याचे अाम्हाला ट्रेनिंग असते.’

अपघात, घातपात की निष्काळजीपणा? या मुद्दयांवर होणार चौकशी
हेलिकॉप्टर अपघाताची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
 
१) हेलिकॉप्टर सिकॉरस्की व्ही. टी. बनावटीचे होते. देशातील उत्कृष्ट हेलीकॉप्टरपैकी एक अशी त्याची ओळख आहे. तर मग उड्डाण करताच त्याचा अपघात कसा झाला? त्यात तांत्रिक बिघाड आहे याची पूर्वकल्पना होती का? असल्यास त्याची कल्पना मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठांना देण्यात आली होती का? आणि कल्पना असूनही तेच हेलीकॉप्टर नेण्याच्या सूचना कोणी दिल्या?

२) हेलिपॅड बनवताना ते वस्तीऐवजी बाहेर का बनवण्यात आले नाही? तारांचे जाळे, विजेचे खांब, डीपी परिसरात असतानाही हेलिपॅडसाठी शिवाजी विद्यालयाचे मैदानच का निवडले? इतर ठिकाणांचा विचार का केला नाही?

३) हेलिपॅड बनवताना धुळ उडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी मारावे लागते. अती धुरळा उडाल्यास दिसण्याची क्षमता कमी होऊन चालकाचे हेलीकॉप्टर वरील नियंत्रण सुटू शकते. निलंग्यात हेलिकाॅप्टरचे उड्डाण होताच मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. त्याचा काही परीणाम झाला काय?
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, हेलिकॉप्‍टर कोसळतानाचा व्हिडिओ आणि घटनेचे फोटोज..
बातम्या आणखी आहेत...