आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटांसाठी त्रास सहन करणारे स्वातंत्र्यसेनानी : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - भ्रष्टाचाराविरुद्ध, काळ्या पैशाविरुद्ध लढाई सुरू झाली आहे. या लढाईमध्ये जे त्रास सहन करतील, ते सगळे सामान्य नागरिकही स्वातंत्र्यसेनानी असतील. काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईमुळे देश ५० वर्षे पुढे जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे काही दिवस त्रास झाला तरी देशाच्या विकासातला अडथळा संपून जाईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची बुधवारी(दि. २३) शहरातील पुष्पक मंगल कार्यालयाच्या मैदानावर प्रचारसभा झाली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, काळ्या पैशाविरुद्ध लढाई करताना मोदींनी तीन निशाणे साधली आहेत. देशातील दहशतवाद्यांकडील काळा पैसा कागदांमध्ये रूपांतरित झाल्याने काश्मीरमध्ये दगड मारणारे आता खाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हवालदिल झाले आहेत. पाकिस्तान बनावट नोटांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये दहशतवाद पसरवत होता. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे, तर देशातील काळ्या पैशावाल्या धेंडांना पैसा कोठे ठेवायचा, अशी चिंता लागली आहे. धनदांडग्यांनी हजारो कोटी रुपये कमावले. ते घरात, गादीखाली, कपाटात दाबून ठेवले होते. हा सगळा पैसा बाहेर आला आहे. रात्रीतून सगळा काळा पैसा बाहेर आला आहे. काळ्या पैशावाल्यांचे तोंड काळे झाले आहे. धनदांडगे रस्त्यावर आले आहेत. मेहनतीने कमावलेला पैसा सुरक्षित आहे. मेहनत करणाऱ्यांची आर्थिक गुलामगिरी आता संपणार आहे. त्यामुळे एका अर्थाने आता स्वातंत्र्याची लढाई आहे. पूर्वी स्वातंत्र्यासाठी आधी रोटी खाएंगे, लाठी-गोली खाएंगे, स्वतंत्रता मिलाएंगे, असे म्हटले जायचे. आता या लढ्यात नोटेसाठी काही दिवस त्रास सहन करा, असे आवाहन त्यांनी केले.

हिंगोलीतही प्रचारसभा
सामान्य माणूस, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या हितासाठी वापरण्यात येणारा कोट्यवधींचा पैसा धनवान, शेटजी लोकांनी चोऱ्या करून उशीखाली, गादीखाली, गोदामात जमा करून ठेवला होता. तो काळा पैसा मोदीजींनी एका दिवसात चलनातून बाद केला आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले असून तुम्ही केवळ ५० दिवस थांबा, नंतर ५० वर्षे मागे वळण्याची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोटाबंदीचे स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...