आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्र्यांचे श्रमदान: कुदळीने माती खोदली अन् टोपल्याने बांधावर टाकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - वेळ सकाळ आठची...शिवार निलंगा तालुक्यातल्या हलगरा गावचा...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदम वेगळ्या वेषात दाखल झाले. अंगावर साधा शर्ट, स्पोर्ट पँट आणि पायात स्पोर्ट शूज. मुख्यमंत्री आले. सगळ्यांना प्रसन्नचित्ताने नमस्कार केला आणि त्यांनी पंधरा ते वीस मिनिटे कंपार्टमेंट बंडिंगच्या कामावर श्रमदान केले. मुख्यमंत्र्यांनी कुदळीने माती उकरली आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ती टोपल्यात भरून बांधावर टाकली...
 
पावणे नऊ वाजता मुख्यमंत्री शिवारातच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली टाकलेल्या बाजेवर येऊन बसले. तेथे मातीच्या डेऱ्यातील पाणी तांब्याच्या ग्लासने पिण्यासाठी ठेवण्यात आले होते. श्रमदानाने घामाघूम झालेल्या फडणवीस यांनी प्रारंभी ग्लासभर पाणी पिले अन् शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. योगेश गायकवाड या तरुणाने मुख्यमंत्र्यांना गावात केलेल्या कामाची पूर्ण माहिती दिली. लोकसहभाग, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि याहू कंपनीत असलेले गावचे भूमिपुत्र दत्ता पाटील यांनी पुढाकार घेऊन या कामासाठी पैसेही पाठवून दिले. त्याचबरोबर गावातल्या प्रत्येकजण गेल्या ५० दिवसांपासून दररोज शिवारात ठरवून दिलेल्या ठिकाणी श्रमदान करतोय, असे सांगितले. एवढेच नव्हे तर शिवजयंती आणि भीमजयंतीला दरवर्षी होणारा खर्च टाळून ते पैसे जलयुक्तच्या कामाला दिले आणि डॉल्बी लावून नाचण्याऐवजी तरुणांनी श्रमदान केल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसही भारावून गेले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

न्याहारी अन् गप्पा: मुख्यमंत्र्यांनी छोटेखानी संवाद सभा आटोपल्यानंतर तेथेच बाजेवर टाकलेल्या घोंगडीवर बसून पत्रकारांशी गप्पा मारल्या. तसेच त्याच ठिकाणी न्याहारी केली. निलंगा राइस म्हणून प्रसिद्ध असलेला मसाला भात आणि मुरमुरे भिजवून केलेला सुशीला या पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला.

हलगरा गाव घेतले दत्तक  
हलगरा गावामधील ग्रामस्थांचा एकोपा. लोकसहभागातून २० किमीचे झालेले नाला खोलीकरण, कंपार्टमेंट बंडिंगची कामे, विहीर पुनर्भरण, जयंत्या टाळून श्रमदान यामुळे आपण भारावलो असून पुढच्या कामांसाठी हे गाव आपण दत्तक घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. सरकारच्या सगळ्या योजना या गावात प्राधान्यक्रमाने राबवल्या जातील आणि त्याची अंमलबजावणी कशी झालीय हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा येणार असेही ते म्हणाले. पाणी आल्यावर लोकांनी सरसकट उसाच्या मागे लागू नये. कमी पाण्यावर येणाऱ्या इतर पिकांचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.
 
बातम्या आणखी आहेत...