आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्र्यांच्‍या लातूर दौऱ्यासाठी पालकमंत्री, अधिकाऱ्यांची भरउन्हात पायपीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसोबत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी भरउन्हात पायपीट केली. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसोबत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी भरउन्हात पायपीट केली.
लातूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी लातूरच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे सर्वच कार्यक्रम आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात आयोजित केले आहेत. त्यात काही विघ्न येऊ नये यासाठी निलंगेकरांनी मंगळवारी अख्खे प्रशासन सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीस्थळी भरउन्हात पायपीट केली.  
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या दौऱ्यात गुरुवारी निलंगा तालुक्यातील विविध कामांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यामध्ये खरोसा लेणी येथील मंदिर येथील नाला खोलीकरणाचे काम, हलगरा येथील श्रमदान ठिकाण, जलयुक्त कामांची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच हंगरगा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे काम, अनसवाडा येथील शेततळे आदी ठिकाणी भेट देणार आहेत.

हा सगळा दौरा नियोजनबरहुकूम पार पडावा यासाठी संभाजी पाटील निलंगेकरांनी या दौऱ्याची जणू मंगळवारी रंगीत तालीमच घडवून आणली.  जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन निलंगेकरांनी सोमवारी या सर्व स्थळांवर जाऊन पाहणी केली. कोण काय बोलेल याचेही नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी मंगळवारी संवाद साधला. त्यामध्ये ज्या विभागांचे मुख्यालय स्तरावर महत्त्वाची कामे प्रलंबित असतील त्या विभागांनी त्याची माहिती लेखी स्वरूपात प्रशासनाला सादर करावी. सर्व विभागांच्या माहितीचे संकलन करून मुख्यमंत्री यांच्यासमोर ती माहिती द्यावी, जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवता येतील, असे निलंगेकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री आज लातूरमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अर्धा डझनहून अधिक मंत्री बुधवारी लातूरमध्ये येत आहेत. भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या मुलाच्या विवाहाचे निमित्त साधून होत असलेल्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी आपापल्या खात्याच्या आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या विवाहाच्या निमित्ताने राज्यभरातील बड्या नेत्यांची मांदियाळी लातूरमध्ये जमणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सायंकाळी लातूरला येतील. दहा दिवसांपूर्वी आयोजित केलेला लातूरचा दौरा त्यांनी पटेल यांच्या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी पुढे ढकलला होता. सायंकाळी पाशा पटेल यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुक्कामासाठी ते निलंग्याला रवाना होतील.  दरम्यान, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत विवाहाला उपस्थित राहून कृषी विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. इतर मंत्र्यांचे दौरे अद्याप आले नसून त्यांनीही याप्रमाणेच नियोजन केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...