आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Fadanvis Declares Package Of 10 Thousand Crore

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचे पॅकेज, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज असले तरी या मदतीने शेतकरी सधन, श्रीमंत अथवा त्यांची उपजीविका त्यावर भागणार नाही. शासनाचा उद्देश शेतकरी वाचला पाहिजे हाच असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. ते पैठण येथील श्रीनाथ हायस्कूल संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त येथे आले होते.

मराठवाड्यासह राज्यात सलग चौथ्या वर्षी भीषण दुष्काळ पडला आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून मानवनिर्मित दुष्काळावर राज्यभरात उपाययोजना करण्यात येणार आहेत. नुकतेच खान्देशात तापी मेगास्कीमद्वारे पाणी जमिनीत जिरवण्याचे काम हाती घेतले घेतले. यातून जमिनीत मुरणाऱ्या पाण्यामुळे चार हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र पाण्याखाली येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, श्रीनाथ संस्थेचे अक्षय शिसोदे, तुषार शिसोदे, आमदार संदिपान भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, उपनगराध्यक्षा रेखा कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, आपला देश हा तरुणांचा देश म्हणून जागतिक पातळीवर ओळखला जातो. आगामी काळात जगाला भारतातील कुशल तरुणांची कामासाठी गरज पडेल, ते तरुण आम्ही घडवणार आहोत. त्यासाठी डीएमआयसीतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असेही ते म्हणाले. या वेळी तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बजेटमध्ये ब्रह्मगव्हाण योजनेसाठी तरतूद करणार
पैठण तालुक्यात जायकवाडीसारखे धरण असतानाही अनेक गावांत पाणी नाही. आगामी बजेटमध्ये तालुक्यातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे यासाठी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी निधीची तरतूद केली जाईल. शिवाय येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा प्रश्न असो की संत पीठाचा, प्रश्न सोडवला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी िदली.

महामार्गाची संख्या दुपटीने करणार
मराठवाडा हा रस्ते विकासापासून कोसो दूर होता, त्यामुळे विकासाला काहीशी खीळ बसत होती. मात्र, या पुढील काळात मराठवाड्यातील महामार्ग हे दुप्पट केले जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.