आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्मुकाळी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही घेतला टोपेंचा पाहुणचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - वर्षभरापूर्वी दुष्काळी जालना जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या घरी जाऊन पाहुणचार स्वीकारला होता. पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याच मार्गावरून जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी राजेश टोपे यांच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारला. आमदार टोपे यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर दबाव निर्माण करण्यासोबतच राष्ट्रवादीशी मैत्री घट्ट करण्यासाठी हे पाऊल टाकल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

२१ नोव्हेंबर २०१४ भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला होता. त्यावेळी शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झालेला होता. शिवाय राज्यात स्थिर सरकार असावे, अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊ केला होता.

त्यामुळे खडसे यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. वर्षभरानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच वाटेवरून जाताना आमदार टाेपे यांच्या घरी पाहुणचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात जवखेडा आणि कडवंची येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना भेटी, कलश सीड्स येथील शेतकरी मेळावा, जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश होता. शेतकरी मेळावा तब्बल दोन तास उशिरा सुरू झाला. हा मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

विविध ठिकाणी भेटी
मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात जालना शहरातील चार ठिकाणी भेटी दिल्या. यात प्रथम पालकमंत्री बबनराव लोणीकर, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, भाजपचे शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, निवृत्त अभियंता एस. एन. कुलकर्णी यांच्या घरी भेटी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात त्यांच्या भेटीगाठीची शहरात चर्चा होती.