आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Jocking On Water To The Women In Osamanabad

उस्मानाबादेत पाणी मागणा-या महिलांची जिल्हाधिका-यांकडून खिल्ली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - अजित पवारांनंतर जिल्हाधिका-यांनीही दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा करण्याचा प्रकार मंगळवारी उस्मानाबादेत घडला. कापड दुकानात किराणा माल मिळणार नाही, असे म्हणून जिल्हाधिका-यांनी पाणी मागणा-या महिलांना हुसकावून लावल्यामुळे संतप्त महिलांनी नंतर येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊण तास ठिय्या मांडला. दरम्यान, असे वक्तव्य करून पाणीटंचाईत होरपळणा-या जनतेची खिल्ली उडवणा-या जिल्हाधिका-यांना निलंबित करण्याची मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, जिल्हाधिका-यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.


येथील आनंदनगर भागातील कर्मचारी निवासस्थान परिसरात गेल्या 15 दिवसांपासून टँकर आला नाही. तसेच येथे पाण्यासाठी प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. रोज प्रतीक्षा करूनही टँकर येत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या येथील सुमारे 30 महिला मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्या. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांची भेट घेतली. त्या वेळी या महिलांना जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले नाही. मात्र, कापड दुकानामध्ये किराणा माल मिळू शकणार नाही, तुम्ही येथून निघून जा, असे म्हणून हुसकावून लावले. नगरपालिकेत जाण्याचाही सल्ला दिला.


अपमान केला
जिल्हाधिका-यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी ‘कापड दुकानात किराणा माल घेण्यासाठी कशाला येता?’ असे म्हणून नगरपालिकेत पाठवले. तेथेही कोणी उपलब्ध नव्हते’’ सरस्वती विणकरे,


शब्द परत घेतो
महिलांना पाणीपुरवठा वितरण यंत्रणेविषयी समजावे म्हणून मी तसे वक्तव्य केले. महिलांना त्रास व्हावा, असा उद्देश नव्हता. तरीही मी माझे शब्द परत घेतो.’’
डॉ. के. एम. नागरगोजे, जिल्हाधिकारी


जिल्हाधिका-यांनी महिलांची क्रूर चेष्टा केली आहे. अशा जिल्हाधिका-यांना निलंबित करावे.’’
नितीन काळे, जिल्हाध्यक्ष, भाजप